Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जयंत पाटीलही अजितदादांसोबत ? मंत्रीपद मिळण्याची चर्चा !

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे तीन सहकार्‍यांसह अजितदादा पवार गटात सहभागी होण्याची चर्चा सुरू असून त्यांना आगामी मंत्रीमंडळात सामावून घेतले जाईल असे मानले जात आहे.

राज्य मंत्रीमंडळाचा शेवटचा विस्तार हे नेमका केव्हा होणार याबाबत सर्वांनाच मोठी उत्सुकता लागली आहे. विशेष करून शिंदे गटातील मंत्रीपदासाठी इच्छुक असणार्‍यांनी याबाबत अनेकदा घोषणा केल्या असल्या तरी अद्यापही विस्तार रखडल्याचे दिसून येत आहे. या अनुषंगाने आता पुढील आठवड्यात मंत्रीमंडळाचा विस्तार होणार असल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली आहे.

अमित शाहा यांच्यासोबत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी रात्री उशीरापर्यंत चर्चा केली. यात १५ ऑगस्टच्या आधी मंत्रीमंडळाचा विस्तार होणार असल्यावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे समजते. लक्षणीय बाब म्हणजे या विस्तारात शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह एकूण चार आमदार हे अजितदादा यांच्या गटात सहभागी होण्याचे संकेत आहेत. यात माजी मंत्री राजेश टोपे यांचे देखील नाव आहे हे विशेष. यात जयंत पाटील यांना जलसंपदा खाते मिळणार असल्याची चर्चा सुरू आहे.

दरम्यान, राज्य मंत्रीमंडळात १४ जागा रिक्त असून यात भाजपला सहा तर शिंदे व पवार गटांना प्रत्येकी चार जागा मिळण्याची शक्यता आहे. यात सर्वाधीक शिंदे गटात चुरस असल्याने चार जणांमध्ये नेमका कुणाचा नंबर लागणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

Exit mobile version