Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अजितदादांसह ‘त्या’ नऊ जणांना अपात्र करा : जयंत पाटील यांची मागणी

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राष्ट्रवादीतल्या फुटीच्या नाट्यानंतर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार सुप्रीया सुळे यांनी रात्री उशीरा घेतलेल्या पत्रकार परिषदेत काही आमदार आमच्याकडे परतण्याच्या मार्गावर असल्याचा गौप्यस्फोट केला आहे.

काल दिवसभर मोठे राजकीय नाट्य घडले. अजित पवार आणि सहकार्‍यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्याने मोठी खळबळ उडाली. यानंतर स्वत: शरद पवार यांच्यासह जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी आपण कोणतीही कायदेशीर लढाई करणार नसल्याचे सूतोवाच केले होते.

यानंतर रात्री बारा वाजेच्या सुमारास जयंत पाटील आणि सुप्रीया सुळे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन नवीन माहिती दिली. याप्रसंगी जयंत पाटील म्हणाले की, राष्ट्रवादीच्या ९ आमदारांनी पक्षाला कोणतीही कल्पना न देता सत्ताधार्‍यांचे सोबत करत मंत्रीपदाची शपथ घेतली असून यासाठी शरद पवार यांना अंधारात ठेवण्यात आले आहे. यामुळे त्यामुळे आम्ही संबंधित आमदारांना अपात्र करण्याबाबत विधानसभा अध्यक्षांना मेल पाठवला आहे. ९ आमदार म्हणजे पक्ष होऊ शकत नाही, आम्ही सर्व कायदेशीर पावलं उचलली असल्याचं जयंत पाटील यांनी सांगितलं. तसेच त्यांनी सदर सदस्यांना अपात्र करण्यासाठी कायदेशीर लढाई करणार असल्याची घोषणा देखील केली.

दरम्यान, जयंत पाटील पुढे म्हणाले की, अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या काही आमदारांनी आमच्याशी संपर्क साधला आहे. या आमदारांना माघारी परतायचं असून त्यांना भाजपसोबत जायचं नाही. तर याप्रसंगी सुप्रीया सुळे म्हणाल्या की, सत्ताधार्‍यांसोबत गेलेले आमदार माझे सहकारी नाहीतर कुटुंबातील लोक आहेत, ही घटना मला वेदना देणारी आहे. शरद पवार हीच आमची प्रेरणा असून नव्या उमेदीने संघटना उभी करू असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

Exit mobile version