Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जय गणेश फाऊंडेशनतर्फे यंदा ऑनलाईन द्वारकाई व्याख्यानमाला

भुसावळ प्रतिनिधी । येथील जय गणेश फाऊंडेशनतर्फे आयोजित करण्यात येणारी द्वारकाई व्याख्यानमाला यंदा ऑनलाईन या प्रकारात आयोजित करण्यात आली आहे. झूम अ‍ॅपच्या माध्यमातून ही व्याख्यानमाला होणार आहे.

भुसावळ शहरातील जय गणेश फाउंडेशनतर्फे स्वर्गीय द्वारकाबाई कालिदास नेमाडे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ ऑनलाइन व्याख्यानमाला आयोजित केली आहे. झूम अ‍ॅपद्वारे २९, ३० व ३१ जुलै असे तीन दिवस सकाळी १० वाजता ही व्याख्यानमाला होईल.
ऑनलाइन व्याख्यानमालेचे प्रथम पुष्प महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यास संशोधन मंडळाचे सदस्य डॉ. जगदीश पाटील हे २९ जुलै रोजी गुंफतील. शाळा आली घरात या विषयावर ते ऑनलाइन शिक्षणाचं महत्व कसं वाढलं आहे ते आपल्या व्याख्यानातून मांडतील. द्वितीय पुष्प जळगावच्या डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालयाचे संरक्षण शास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. जयेंद्र लेकुरवाळे हे ३० जुलै रोजी गुंफतील. बाप माझा सांगाती हा त्यांचा विषय असेल. त्यातून ते कष्टकरी बापाच्या धडपड्या लेकरांची कहाणी व स्वानुभव मांडतील. तर तृतीय पुष्प हिंगोली जिल्ह्यातील सावळी खुर्द येथील शेतकरी कवी गणेश प्रल्हादराव आघाव हे गुंफतील. कवितेचं शेतशिवार हा त्यांचा विषय असेल. शेताच्या बांधावर फुललेल्या कविता ते मांडतील.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर तिन्ही व्याख्याने ऑनलाइन झूम अ‍ॅपद्वारे, फेसबुक लाईव्ह आणि युट्यूब द्वारे होतील. ऑनलाइन व्याख्यानांचा लाभ शहरातील हजारो रसिक घेऊ शकतील. अशी माहिती जय गणेश फाउंडेशनचे संस्थापक व माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे, माजी नगरसेविका सुषमा नेमाडे यांनी दिली आहे.

दरम्यान, आयोजन जय गणेश फाउंडेशनचे समन्वयक अरुण मांडाळकर, फाउंडेशनचे सल्लागार समन्वयक गणेश फेगडे, बालभारतीचे सदस्य डॉ. जगदीश पाटील, प्रा. डॉ. जतीन मेढे, प्रा. आर. एच. पाटील यांचा समावेश आहे.

Exit mobile version