Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जावेद अख्तर यांनी अफगाणिस्थानात जावे : भाजपचा हल्लाबोल

 

 

नागपूर | संघ, विहिंप आणि बजरंग दलाची तालीबानशी तुलना करणारे प्रसिध्द गीतकार जावेद अख्तर यांच्यावर भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे आणि आ. अतुल भातखळकर यांनी जोरदार हल्लाबोल करत त्यांना अफगाणिस्थानमध्ये जाण्याचा सल्ला दिला आहे.

याबाबत वृत्त असे की, गीतकार आणि पटकथा लेखक जावेद अख्तर यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलतांना केलेले वक्तव्य वादाच्या भोवर्‍यात सापडले आहे. ते म्हणाले होते की, आरएसएस, विहिंप आणि बजरंग दल सारख्या संघटनांचेही तालिबान सारखेच उद्दिष्ट आहे. ते म्हणाले की, भारतीय संविधान त्याच्या ध्येयाच्या मार्गात येत आहे, परंतु जर संधी मिळाली तर ते या सीमा देखील ओलांडतील.

या वक्तव्यावरून आज चंद्रशेखर बावनकुळे आणि आ. अतुल भातखळकर यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. बावनकुळे म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल केलेले विधान निषेधार्थ आहे. अख्तर यांनी अफगाणिस्तान येथे जाऊन तालिबानी अतिरेक्यांसोबत राहावे म्हणजे त्यांना या अतिरेकी संघटनेबद्दल वस्तुस्थिती लक्षात येईल. राष्ट्रीय स्वंयसेवक संघ ही संघटना देशप्रेमाची, सेवाभावाचे संस्कार रुजविणारे विद्यापीठ आहे. समाजातील शेवटच्या घटकाच्या, वंचितांच्या कल्याणासाठी काम करणारी ही संघटना आहे. जावेद अख्तर यांनी हे वादग्रस्त विधान मागे घावे अशी मागणी बावनकुळे यांनी केलीय.

तर आ. अतुल भातखळकर म्हणाले की, जावेद अख्तर यांचं विधान म्हणजे केवळ बेशरमपणाचा कळस नसून समस्त हिंदू समाजाचा अपमान आहे. जावेद अख्तर हे विसरतात की या हिंदू बहुसंख्य असलेल्या देशात राहून ते टीका करत आहेत. हिंमत असेल तर अफगाणिस्तानात जा आणि तालिबानवर टीका करा. त्यामुळे जावेद अख्तर आपलं विधान मागे घ्या, हिंदू समाजाची क्षमा मागा. नाहीतर तुमच्या विरोधात बदनामीचा खटला दाखल केला जाईल असा इशारा सुध्दा त्यांनी दिला.

Exit mobile version