अस्थिरोग संघटना स्थापना दिनानिमित्त जळगावात जनजागरण अभियान (व्हिडीओ)  

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र अस्थिरोग संघटना प्रतिवर्षी १ मे हा संघटनेचा स्थापना दिवस म्हणून साजरा करते. त्यानिमित्त १ ते ७ मे दरम्यान ‘अस्थिरोग व आरोग्य’ याबद्दल जनजागरण अभियान राबविण्यात येणार आहे.

यावर्षी ‘लव्ह फिटनेस अॅड प्रिव्हेन्ट ऑर्थोपेडिक डिसीजेस’ अर्थात ‘शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त रहा आणि हाडांचे आजार टाळा’ ही या अभियानाची मुख्य थीम आहे. या भूमिकेतून आठवडाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती जळगाव अस्थिरोग संघटनेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र सरोदे, सचिव डॉ. भुषण झंवर व विभाग प्रमुख डॉ. सुनिल नाहाटा यांनी पत्रकार परिषदेत दिली. आयएमए सभागृहात बुधवार, दि.२७ रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत आहे. यावेळी आयएमए जळगावचे सचिव डॉ. जितेंद्र कोल्हे व जनसंपर्क प्रमुख डॉ. विनोद जैन यांची उपस्थिती होती.

बुधवार दि. ४ मे रोजी सकाळी ७ वाजता भाऊंचे उद्यान येथे जनजागृतीपर व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले असून त्यात डॉ. ज्योती गाजरे, डॉ. मनिष चौधरी, डॉ. निरंजन चव्हाण, डॉ. पराग नाहाटा आदी अनुक्रमे योगा, शस्त्रक्रियेशिवाय गुडघे दुखी टाळा, हाडांचा ठिसूळपणापासून बचाव, आधुनिक जीवन शैली काळाची गरज आदि विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रम सर्वांसाठी खुला असल्याचे व कार्यक्रमानंतर नागरिकांच्या शंकानिरसन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दि. १ मे रोजी औरंगाबाद येथे एम-ओ-ए डे स्थापना दिनानिमित्त उद्घाटन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यासाठी महाराष्ट्र अस्थिरोग संघटनेचे अध्यक्ष डॉ. वासुदेव गाडेगोने, सचिव डॉ. नारायण कर्णे, उपाध्यक्ष डॉ. प्रमोद शिंदे, सर्व राज्य कार्यकारणी सदस्य तसेच औरंगाबाद अस्थिरोग डॉ. संघटनेचे डॉ. यशवंत गाडे, डॉ. सारंग देवरे, डॉ. संतपुरे शिवकुमार, डॉ. मारुती लिंगायत, डॉ धुळे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन होणार आहे.

तसेच आठवडाभर राज्यभरातील संघटनेच्या सर्व सदस्य व रुग्णांच्या जनजागरणासाठी, राज्यभरातील मान्यवर डॉक्टर व विशेष तज्ञ यांचे कार्यक्रम आयोजित केले आहेत. त्याचे थेट प्रक्षेपण ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. त्यात डॉ. सुनील मारवाह, डॉ. पराग संचेती, डॉ. विजय काकतकर, डॉ. जॉन एब्नेजार, डॉ. एन जे कर्णे, योगी सत्यानंद, डॉ. राजेंद्र अभ्यंकर, डॉ. मिलिंद पत्रे, डॉ. शैलेश पानगावकर, डॉ.राहुल झांजुरणे, डॉ. श्रीकांत ताम्हाणे इत्यादी ज्येष्ठ मान्यवरांचे मार्गदर्शक व्याख्यान होणार आहे.

तसेच राज्यभर रुग्णांच्या जनजागरण अभियान, मार्गदर्शन, वृत्तपत्रात लेखाद्वारे, तसेच स्थानिक क्लब मध्ये मार्गदर्शक व्याख्यान, शिबिरे इ. भरगच्च कार्यक्रम केलेले आहेत. सदर कार्यक्रमाचा उद्देश रुग्णांमध्ये शारीरिक तंदुरुस्ती अर्थात फिटनेस वाढवून विविध अस्थिरोग टाळण्यासाठी व आरोग्यदायी जीवन शैली वाढवण्यासाठी नक्कीच उपयोग होणार आहे. या सर्व अभियानात सर्वांनी सहभाग नोंदवून लाभ घ्यावा, असे आवाहन जळगाव अस्थिरोग संघटनेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र सरोदे, सचिव डॉ. भुषण झंवर व विभाग प्रमुख डॉ. सुनिल नाहाटा यांनी केले आहे.

व्हिडीओ लिंक
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/515565966866616

Protected Content