Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

संस्कारांमध्येच अपराधाला आळा घालण्याची क्षमता- जनार्दन हरीजी महाराज ( व्हिडीओ )

फैजपूर, ता. यावल निलेश पाटील । सरकार अपराधाला आळा घालण्यासाठी प्रयत्न करत असले तरी याचा फारसा लाभ झालेला नाही. तथापि, संस्कारांमध्येच अपराधाला आळा घालण्याची क्षमता असल्याचे प्रतिपादन महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज यांनी केले. अयोध्या येथील नियोजीत श्रीराम मंदिराच्या भूमिपुजन सोहळ्याला रवाना होण्याआधी लाईव्ह ट्रेंडस न्यूजला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते.

फैजपूर येथील सत्पंथ देवस्थानाचे गादीपती तथा महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज यांना ५ ऑगस्ट रोजी अयोध्या येथे आयोजित करण्यात आलेल्या भगवान श्री राम मंदिराच्या भूमिपुजनासाठी आमंत्रीत करण्यात आले आहे. या सोहळ्याला मोजक्या मान्यवरांची उपस्थिती राहणार असून उत्तर महाराष्ट्रातून एकमेव त्यांना या कार्यक्रमासाठी आमंत्रीत करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला रवाना होण्यापूर्वी त्यांनी लाईव्ह ट्रेंडस न्यूजला विशेष मुलाखत दिली. यात त्यांनी म्हटले की, गेल्या पाचशे वर्षांपासून अयोध्येतील भगवान श्री राम मंदिरासाठी सुरू असलेल्या लढ्याला आता यश मिळाले आहे. न्यायालयाने सर्व पुरावे तपासून भगवान श्री रामाच्या मंदिराच्या बाजूने निकाल दिला आहे. या ऐतिहासीक क्षणाचा साक्षीदार होण्याचे भाग्य मला मिळाले आहे. तथापि, मला मिळालेले आमंत्रण हे वैयक्तीक नसून सामूहिक अर्थात खान्देशी जनतेला मिळालेले असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.

जनार्दन हरीजी महाराज पुढे म्हणाले की, सध्याच्या कोरोनाच्या कालखंडात राम मंदिराच्या भूमिपुजनाच्या औचित्यावरून सुरू असलेले वाद निरर्थक आहेत. देवस्थानांनी कोरोनाच्या कालावधीत अनेक सेवाभावी काम केले आहे. सत्पंथी मंदिराच्या माध्यमातून आम्ही लॉकडाऊनमध्ये अनेक सेवाभावी काम केले असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, सरकार अपराधांना आळा घालण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. तथापि, अपराध हे केवळ कायदा नव्हे तर संस्कारांनी कमी होऊ शकतात. याच प्रकारचे आदर्श संस्कारी जीवन हे प्रभू रामचंद्रांचे असून त्यांच्या आदर्शाचे आपण पालन करावे असे जनार्दन हरीजी महाराज म्हणाले.

खालील व्हिडीओत पहा जनार्दन हरीजी महाराज नक्की काय म्हणालेत ते ?

Exit mobile version