Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पोलिसांना धक्का-बुक्की करणार्‍यांची कोठडीत रवानगी

जामनेर प्रतिनिधी | तालुक्यातील लोणी येथील अतिक्रमण काढतांना बंदोबस्तावर असणारे पोलीस निरिक्षक आणि कर्मचार्‍यांना धक्का-बुक्की करणार्‍या सात आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

याबाबत वृत्त असे की, जामनेर तालुक्यातील लोणी येथील ग्रामपंचायतीच्या जागेवरील अतिक्रमण काढण्यासाठी, बंदोबस्तावर असलेल्या पोलिस निरीक्षकांना मारहाण झाल्याची घटना गुरुवारी घडली होती. या घटनेचा व्हिडीओ राज्यभरात व्हायरल झाला असून यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.

लोणी येथील गावठाण जागेवर प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत उभी आहे. याच ठिकाणी ज्ञानेश्वर कडू उगले यांनी अतिक्रमण केले होते. ग्रामपंचायतीने अतिक्रमण काढण्यासाठी पोलिस बंदोबस्त मागवला होता. यावेळी संशयित ज्ञानेश्वर कडू उगले व त्यांचा भाऊ दत्तू उगले यांनी पोलिसांना मारहाण केली होती. या संदर्भात पोलिस निरीक्षक अरूण धनवडे यांच्या फिर्यादीवरून दत्तू उगले, ज्ञानेश्वर उगले, भास्कर वाघ, मधू उगले, पावन उगले, किर्तीराज उगले, सागर केशव उगले या सात जणांविरुद्ध शासकीय कामात अडथळा व दंगलीचा गुन्हा दाखल झाला.

दरम्यान, सातही संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे. जामनेर न्यायालयाने सातही संशयितांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. तर, न्यायालयात संशयित दत्तू उगले व ज्ञानेश्वर उगले यांनी पोलिसांनी मारहाण केल्याची तक्रार केली.

Exit mobile version