Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पालकमंत्र्यांची जामनेरात सरप्राईज व्हिजीट; आरोग्य सेवेची झाडाझडती

जामनेर प्रतिनिधी । जामनेर तालुक्यात कोरोनाच्या संसर्गाचा विस्फोट झाला असतांनाच पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी जामनेर येथे अकस्मात भेट देऊन वैद्यकीय सेवेची झाडाझडती घेतली.

याबाबत वृत्त असे की, या बाबत वृत्त असे की, जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येत आहे. यात जामनेर तालुक्यातील कोरोना रूग्णांची संख्या लक्षणीयरित्या वाढलेली असतांनाच वैद्यकीय सुविधेचा बोजवरा उडालेला आहे. काही दिवसांपूर्वीच येथील कोरोना बाधीत रूग्ण हे कोविड केअर सेंटरमधून पळून घरी गेल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. तर, यानंतर एकाच दिवशी तब्बल १३ रूग्णांचा मृत्यू झाल्याने येथील परिस्थिती अतिशय भयावह बनल्याची स्थिती जगासमोर आली होती.

या पार्श्‍वभूमिवर, आज सायंकाळी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी जामनेर व पहूर येथे सरप्राईज व्हिजीट दिली. त्यांनी शहरातील उपजिल्हा रूग्णालय आणि दोन खासगी रूग्णालयांमधील कोविड सेवेचा आढावा घेतला. यात त्यांनी झाडाझडती घेऊन दर्जेदार रूग्णसेवा करण्याची तंबी दिली. अनेक खासगी रूग्णालयांमध्ये अव्वाच्या सव्वा पैशांची आकारणी करण्यात येत असतांनाच रूग्णांच्या जीवाशी खेळ करण्यात येत असल्याचेही दिसून आल्याने पालकमंत्री संतप्त झाले.

दरम्यान, याप्रसंगी पालकमंत्री पत्रकारांशी बोलतांना म्हणाले की, जामनेरातील आरोग्य सेवेचा बोजवारा उडाला असून कोविडग्रस्तांना दर्जेदार सेवा पुरविण्याचे निर्देश आज देण्यात आलेले आहेत. यात कसूर करणार्‍यांवर नियमानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. तर, जामनेरकरांना आपण वार्‍यावर सोडणार नसून जिल्हा प्रशासन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्र्यांनी याप्रसंगी केले.

Exit mobile version