Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आ. गिरीश महाजन यांच्यासह समर्थकांकडून जीवाला धोका- लोढांचे निवेदन

जळगाव प्रतिनिधी । माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांचा आरोग्याच्या नावाखाली कोट्यवधींचा घोळ असून त्यांची काही सिक्रेट आपल्या जवळ आहेत. यामुळे त्यांच्यासह समर्थकांकडून आपल्या जीवाला धोका असल्याची तक्रार प्रफुल्ल लोढा यांनी केल्याने खळबळ उडाली आहे.

कधी काळी गिरीश महाजन यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे प्रफुल्ल लोढा आता राष्ट्रवादीत आहेत. त्यांनी त्यांच्यावर अलीकडच्या काळात आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत. त्यांनी आधीच जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे गिरीश महाजन यांच्याबाबत तक्रार केली होती. यानंतर आता त्यांनी पुन्हा एका निवेदनाच्या माध्यमातून आ. महाजन आणि त्यांच्या समर्थकांकडून जीवाला धोका असण्याचे आरोप केले आहेत.

या निवेदनात लोढा यांनी म्हटले आहे की, माजी मंत्री आ. गिरीश महाजन व त्यांचे समर्थक रामेश्‍वर नाईक यांच्यापासून माझ्या व माझ्या कुटुंबीयांच्या जीवाला धोका आहे. याबाबत मी १८ जून रोजी पोलीस अधीक्षक तसेच मुख्यमंत्री यांना तक्रार अर्ज सादर केला आहे. यातच रामेश्‍वर नाईक यांनी ३० व ३१ जुलै रोजी व्हॉट्सअप कॉलिंगद्वारे कॉल करून आमच्या नादी लागू नको, आमचे खूप मोठ्या लोकांशी संबंध आहेत. तुला मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश तसेच बिहारमधील गुंडांमार्फत किंवा वाहनाने अपघात करून जीवे मारून टाकू, अशी धमकी दिल्याचा आरोप या निवेदनात करण्यात आला आहे.

या निवेदनात आमदार गिरीश महाजन, रामेश्‍वर नाईक व त्यांचे नातेवाईक आणि काही अधिकार्‍यांची नावे निवेदनात घेतली असून, त्यांच्यापासून जीवितास धोका असल्याचे लोढांनी म्हटले आहे. ते माझा घातपात करून शकतात. यामुळे, गेल्या ४ ते ५ महिन्यांपासून मी माझ्या काही हितचिंतकांकडून वर्गणी गोळा करून पोलीस बंदोबस्त घेतला आहे. परंतु, आता मला पोलिस बंदोबस्तासाठी पैसे भरणे शक्य नाही. त्यामुळे मला पोलीस बंदोबस्त देण्यात यावा अशी मागणी या निवेदनामध्ये करण्यात आली आहे.

दरम्यान, आ. गिरीश महाजन आणि रामेश्‍वर नाईक यांच्यावर निरामय फाउंडेशन, जी. एम. फाउंडेशनच्या माध्यमातून आरोग्य सेवेच्या नावाखाली कोट्यवधींचा गैरव्यवहार केला असून याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी देखील केली आहे. तर दुसरीकडे आ. महाजन यांच्या कडून याबाबत कोणतेही भाष्य करण्यात आलेले नाही. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

Exit mobile version