कोवीड रूग्णांशेजारी आणून ठेवला मृतदेह ! : जामनेरातील धक्कादायक प्रकार

जामनेर प्रतिनिधी । येथील उपजिल्हा रूग्णालयातील कोविड विभागातील रूग्णांशेजारी एका कोरोना बाधीताचा मृतदेह आणून ठेवल्यानंतर काही वेळातच दुर्गंधी आल्याने रूग्णांनी वॉर्डाबाहेर थांबावे लागल्याचा धक्कादायक प्रकार आज उघडकीस आला आहे.

याबाबत वृत्त असे की, सामरोद येथील कोरोनाबाधीत रूग्ण शहरातील एका खाजगी रूग्णालयात उपचार घेत होता. सोमवारी त्यांची सायंकाळी साडेपाच वाजेदरम्यान त्यांचा मृत्यु झाल्याची बातमी सामरोद गावात कळली. गावातील काही नागरीकांनी खात्री करण्यासाठी खाजगी रूग्णालयात संपर्क केला असता संबंधीत रूग्ण अत्यवस्थ असून व्हेंटीलेटर लावल्याचे सांगण्यात आले. मात्र यानंतर रूग्णाचा मृतदेह रात्री साडेबारा वाजेदरम्यान जामनेर उपजिल्हा रूग्णालयाच्या कोवीड वार्डात आणून ठेवण्यात आला.

याप्रसंगी संबंधीत रूग्णालया फक्त ऑक्सीजन मास्क लावून उपचाराचा देखावा करण्यात आल्याचे रूग्णालयात भरती असलेल्या रूग्णांना दिसून आले. दरम्यान, रात्री मृतदेहाची दुर्गंधी येऊ लागल्याने अन्य रूग्णांनी उपजिल्हा रूग्णालयाच्या आवारात येऊन रात्र काढली.

आज सकाळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष पप्पू पाटील आपल्या मित्राला भेटावयास आले तेव्हा सर्व रूग्णांनी घडलेला प्रकार सांगीतला. त्यावर त्यांनी संताप व्यक्त करीत उपजिल्हा रूग्णालयाच्या अधिकार्‍यांना फोन केला मात्र प्रतिसाद मिळाला नाही. गावातील काहींनी डॉक्टरांशी संपर्क साधून सत्यता पडताळण्याचा प्रयत्न केला असता रूग्ण अत्यवस्थ असून व्हेंटीलेटरवर असल्याचे खाजगी रूग्णालयातून सांगीतले गेले. असे असतांना मध्यरात्री साडेबारा वाजेदरम्यान रूग्णाला सुटी देण्याचे कारण काय? असा प्रश्‍न उपस्थीत करून हा रूग्ण त्याचवेळी दगावलेला होता. केवळ खाजगी दवाखाण्यात मृत्युदर दिसू नये म्हणून मध्यरात्री मृतदेह उपजिल्हा रूग्णालयात आणून ठेवण्याचा खटाटोप केल्याचे आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष जितेश (पप्पू) पाटील यांनी केला.

संबंधीत रूग्णावर खाजगी दवाखान्यात उपचार सुरू होते त्याठिकाणी रूग्णाचा मृत्यु झाला. हॉस्पीटलचे व डॉक्टरांचे नाव बदनाम होऊनये म्हणून मृतदेह मध्यरात्री जामनेर उपजिल्हा रूग्णालयात आणून ठेवला. मृत झाल्याने उपचार करण्याचा प्रश्‍नच नव्हता. केवळ तोंडावर ऑक्सीजन मास्क लाऊन उपचाराचा देखावा करण्यात आला. यामुळे मात्र वार्डातील अन्य रूग्णांचे मनोबल खचले. हा प्रकार गंभीर असून याप्रकरणी चौकशी होऊन योग्य ती कार्यवाही व्हावी. अशी मागणी जितेश (पप्पू) पाटीलयांनी पत्रकारांशी बोलतांना केली.

दरम्यान, हॉस्पीटलच्या अधिकार्‍यांनी या दाव्याला फेटाळून लावले आहे. संबंधीत पेशंट उपजिल्हा रूग्णालयात आणले तेव्हा अंत्यवस्थ होते. प्रतिसाद मिळत नसल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यु झाला. मात्र रात्री एकच वार्डबॉय असल्याने मृतदेह रॅपर करून शवागारात ठेवता आला नाही. त्यातही काही चुकीचे झाले असल्यास चौकशी करून कार्यवाही प्रस्तावीत करणार असल्याचे उपजिल्हा रूग्णालयाचे अधिक्षक डॉ.विनय सोनवणे यांनी स्पष्ट केले. मात्र या सर्व प्रकारामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.

Protected Content