Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

झेडपी अध्यक्षांनीच कोंडी होत असल्याची केली तक्रार

जळगाव प्रतिनिधी । लोकप्रतिनिधी आणि अधिकार्‍यांचा एक गट आपली कोंडी करत असल्याचा आरोप जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उज्जवला पाटील यांनी केल्याने खळबळ उडाली आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीआधी राजकीय वर्तुळातील वातावरण तापण्यास प्रारंभ होत असतांनाच आता जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांनी काही अधिकारी आणि लोकप्रतिनिधी आपली कोंडी करत असल्याचा आरोप करून खळबळ उडवून दिली आहे. उज्ज्वला पाटील पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या की, जिल्हा परिषदेच्या इतिहासात प्रथमच सर्व सदस्यांना समान निधीचे या वेळी वाटप केले आहे. यापूर्वीच्या अध्यक्षांकडे असा कुणीही हट्ट धरला नव्हता. सर्वच सदस्य सारखे नाहीत, परंतु मोजके ५-७ जण आणि काही अधिकारी मिळून राजकीय षडयंत्र करत असतात. महिला अध्यक्षा असल्याचा गैरफायदा घेऊन सातत्याने राजकीय अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. अध्यक्षांनी केवळ शोभेचे पद म्हणून रहावे, बाकी सर्व कारभार त्यांनीच चालवावा म्हणून सातत्याने कुरघोड्या सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. आपण जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडे यासंदर्भात कैफियत मांडणार असून महिला आयोगाकडे त्या अधिकार्‍यांची तक्रार करणार असल्याचा इशारा अध्यक्षांनी दिला आहे.

आपण अध्यक्ष म्हणून पदभार घेतला त्या वेळी अधिकार्‍यांनी १७ कोटी रुपयांचे दायित्व दाखवले होते. यावर्षी मी ३० लाखांची कामे दिली आहे. ते मंजूर न करता अधिकार्‍यांनी प्रशासकीय मान्यता अडवून ठेवल्या आहेत, असा आरोपही अध्यक्षांनी केला आहे. तर, जिल्हा परिषदेतील सर्व सदस्यांना समान निधी वाटप करण्यात आला आहे. या निधीतून अधिकार्‍यांना देखील समान वाटा हवा आहे. त्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. समान निधीची कामे घेऊन बाहेरील यंत्रणेमार्फत ही कामे पूर्ण करण्याची काही अधिकार्‍यांची साखळी असल्याचा आरोपदेखील जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उज्ज्वला पाटील यांनी केला आहे.

Exit mobile version