जनहिताच्या प्रतिज्ञेसह युवाशक्तीच्या गणरायाची प्रतिष्ठापना !

जळगाव प्रतिनिधी | शहरातील काव्यरत्नावली चौकात युवाशक्ती फाऊंडेशनच्या गणेश स्थापनेप्रसंगी महापौर जयश्री सुनील महाजन यांनी उपस्थितांना शहर स्वच्छतेसह जनहिताचा संकल्प करण्याची प्रतीज्ञा करवून घेतली. आगामी दहा दिवसांमध्ये भेट देणार्‍या सर्व मंडळांमध्ये याच प्रकारचा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे महापौरांनी सांगितले आहे.

याबाबत वृत्त असे की, युवाशक्ती फाऊंडेशन व भवरलाल ऍण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने साजरा होणार्‍या गणेशोत्सवांतर्गत शहरातील काव्यरत्नावली चौकात काल सायंकाळी महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन व महापालिकेतील विरोधी पक्षनेतेसुनिल महाजन या दाम्पत्याच्या शुभ हस्ते श्रीगणेशाची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली.

गणरायाची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर, महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतःच्या घरासह शहर स्वच्छ ठेवण्यासाठी सदैव तत्पर राहणे, पाण्याच्या अपव्ययासह होणारी नासाडी थांबविणे, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी किमान एक झाड लावून ते दत्तक घेत त्याचे संगोपन करणे यासाठीची प्रतिज्ञा स्वयंस्फूर्तीने घेतली. त्यानंतर शहराच्या सर्वांगीण विकासाच्या स्वप्नपूर्तीकरिता सर्वांना शक्ती प्राप्तीसाठी श्रीगणेशाला साकडेही घालण्यात आले.

महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन म्हणाल्या, की मी आजपासून पुढील दहा दिवस शहरातील ज्या मंडळांच्या ठिकाणी दर्शनास्तव जाईल तेव्हा तेथे उपस्थित गणेशभक्तांकडून स्वतःच्या घरासह शहर स्वच्छ ठेवण्यासाठी सदैव तत्पर राहणे, पाण्याच्या अपव्ययासह होणारी नासाडी थांबविणे, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी किमान एक झाड लावून ते दत्तक घेत त्याचे संगोपन करणे यासाठीची प्रतिज्ञा करवून घेईल. तसेच शहराच्या सर्वांगीण विकासाच्या स्वप्नपूर्तीकरिता सर्वांना शक्ती प्राप्तीसाठी श्रीगणेशाला साकडे घालेन. यावेळी महापौरांच्या या अभिनव निर्णयाचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले.

युवाशक्ती फाऊंडेशनच्या श्रीगणेश प्रतिष्ठापनेचे यंदाचे १३ वे वर्ष आहे. याप्रसंगी युवाशक्ती फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विराज कावडीया, अमित जगताप, प्रितम शिंदे, भूषण सोनवणे, पीयूष हसवाल, प्रवीण बारी, विशाल तिवारी, संदीप सूर्यवंशी, सौरभ कुलकर्णी आदींसह कार्यकर्ते व भक्तगण उपस्थित होते. यावेळी उपस्थित भक्तगणांनी शासनाने घालून दिलेल्या मार्गदर्शक सूचना व नियमांचे तंतोतंत अनुपालन केले.

Protected Content