Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राज्यस्तरीय योग संमेलनात जळगावचे योगाचार्य कृणाल महाजन मुख्य भूमिकेत

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | महाराष्ट्र योगशिक्षक संघाचे पहिले राज्यस्तरीय योगशिक्षक संमेलन महायोगोत्सव २०२२हे नाशिकमध्ये आयोजित करण्याचे ठरले आहे. संमेलन यशस्वी पार पडावे याकरिता राज्यातील प्रमुख आणि तज्ञ योगाचार्यांची राज्य नियोजन समिती स्थापन करण्यात आली असून या समितीमध्ये जळगावचे योगाचार्य कृणाल महाजन सदस्य असून प्रमुख भूमिकेत आहेत.

हे संमेलन दि. १० आणि ११ डिसेंबर २०२२ असे दोन दिवशीय होणार असून राष्ट्रसंत श्री.जनार्दन स्वामी मठ, जनार्दन स्वामी नगर, तपोवन, पंचवटी येथे घेण्यात येणार आहे. याप्रसंगी संमेलन यशस्वी पार पडावे याकरिता राज्यातील प्रमुख आणि तज्ञ योगाचार्यांची राज्य नियोजन समिती स्थापन करण्यात आली आहे. सदर समितीमध्ये जळगावचे योगाचार्य कृणाल महाजन सदस्य असून प्रमुख भूमिकेत आहेत. संमेलनात त्यांचे व्याख्यान देखील ठेवण्यात आले आहे.

यात राहुल येवला यांची अध्यक्ष व संमेलन प्रमुख पदावर निवड करण्यात आली असून सदानंद वाली, भालचंद्र नेरपगार, अंजली देशपांडे, दिनेश भुतेकर, संतोष खरटमोल, मोहन कवठेकर, चंद्रकांत अवचार, मनोज नाईक इत्यादी राज्यातील तज्ञ सदस्य आहेत.

सदर संमेलन दोन दिवस चालणार असून यात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. प्रमुख तज्ञांची व्याख्याने होणार आहेत. योगासन स्पर्धा व निबंध स्पर्धा घेण्यात येणार असून शोध निबंध, लेख, योग विषयी इतर विशेष कार्यक्रमांचा समावेश आहे. सदर कार्यक्रमाची स्मरणीका तयार करण्यात येणार असून योगसाधकांना मोफत देण्यात येणार आहे. तसेच उपस्थितांना प्रमाणपत्र व स्पर्धकांना पारितोषिके देण्यात येणार आहेत.

तसेच स्थानिक नियोजन कार्यासाठी नाशिक जिल्हा कार्यकारिणीची समिती स्थापना करण्यात आली असून अध्यक्ष डॉ. प्रज्ञा पाटील, उपाध्यक्ष डॉ. तस्मिना शेख, सचिव, प्रसाद कुलकर्णी, सहसचिव जीवराम गावले, संमेलनाध्यक्ष योगाचार्य अशोक पाटील, समन्वयक उत्तमराव अहिरे, सर्व जिल्हा कार्यकारणी सदस्य गीता कुलकर्णी किशोर भंडारी, दीपाली खोडदे, सुहास खालिडकर, सीमा ठाकरे,शर्मिला डोंगरे, दत्ता कुलकर्णी, डॉ. विनोद भट, विठ्ठल पवार, कल्पना पवार, वैशाली रामपूरकर, भारती सोनवणे, डॉ. अंजली भालेराव, मंदार भागवत, अनुष्का खळतकर, अर्चना दिघे आदींचा समावेश आहे

राज्यातील जास्तीत जास्त योग शिक्षक, योगसाधक व योग प्रेमींनी या संमेलनात उपस्थित राहुन योग महोत्सवाचा आनंद साजरा करावा. असे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आले आहे. या संमेलनाच्या उद्घाटनासाठी प्रमुख अतिथि म्हणून पंतप्रधान पुरस्कार प्राप्त योगाचार्य डॉ.विश्वास मंडलिक गुरुजी उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्र योगशिक्षक संघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ.मनोज निलपवार व महासचिव अमित मिश्रा यांनी सदर नियोजन समितीचे पदाधिकारी सदस्य व कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले असून योगप्रेमी साधक, सामान्य नागरिक यांनी संमेलनात सहभागी व्हावे. असे आवाहन केले आहे.

Exit mobile version