अशोक कोळी यांच्या कथासंग्रहास महाराष्ट्र साहित्य परिषदेचे पारितोषिक

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | महाराष्ट्र साहित्य परिषदेचे ’फुलाबाई आनंदराव फडतरे स्मृती ग्रंथ पारितोषिक’ जिल्ह्यातील ख्यातनाम लेखक डॉ. अशोक कौतिक कोळी यांच्या कडीबंदी या कथासंग्रहास जाहिर झाले आहे.

महाराष्ट्र साहित्य परिषद,पुणे यांचे वतीने विविध वार्षिक ग्रंथ पारितोषिक दिले जातात. त्यापैकी संस्कृती प्रकाशन, पुणे यांचे पुरस्कृत ’फुलाबाई आनंदराव फडतरे’ पारितोषिक डॉ. कोळी यांच्या कडीबंदी या कथासंग्रहासाठी जाहीर झाले आहे. सदर पारितोषिक सर्वोत्तम ग्रामीण साहित्यातल्या कलाकृतीसाठी देण्यात येते. २६, मे रोजी पुण्यातील एस.एम. जोशी सभागृहात प्रसिद्ध हिंदी लेखक अशोक वाजपेयी यांचे हस्ते सदर पुरस्कार वितरण होणार आहे. या समारंभाचे अध्यक्षस्थान प्रसिद्ध विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे हे भूषविणार आहेत.

कडीबंदी हा डॉ. अशोक कौतिक कोळी यांचा पाचवा कथासंग्रह असून यातून त्यांनी कोरोना काळातील भयावह भवतालाला कथनरूप दिलेले आहे. सप्तर्षी प्रकाशन, मंगळवेढा यांचे वतीने हा कथासंग्रह प्रकाशित करण्यात आलेला आहे. कोळी हे समकालाला समर्थपणे भिडणारे वर्तमानकाळातील आघाडीचे लेखक आहेत. कूड, सूड, आसूड, उलंगवाडी हे त्यांचे कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. पाडा, कुंधा, दप्तर, रक्ताळलेल्या तुरी, मेटाकुटी ह्या कादंबर्‍या प्रकाशित आहेत. खास ग्रामीण संवेदन आपल्या अनोख्या शैलीत प्रकटीकरण करण्यात लेखक कोळी यांची विलक्षण हातोटी आहे. त्यांना आधी देखील अनेक पुरस्कारांनी सन्मानीत करण्यात आले असून आता ’फुलाबाई आनंदराव फडतरे’ पारितोषिकाची भर पडली आहे. हा पुरस्कार घोषीत झाल्यामुळे अशोक कोळी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे.

Protected Content