Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गुलाबभाऊंनी पाळला शब्द… विद्यापीठात बहिणाबाई चौधरी यांच्या पुतळ्याचा मार्ग मोकळा

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापिठाच्या परिसरात ज्यांच्या नावाने विद्यापीठ आहे त्या बहिणाबाई चौधरी यांचा भव्य पुतळा उभारण्यात येईल असे अभिवचन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिले होते. त्यांनी हा दिलेला शब्द पाळला आहे.

कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे नाव उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला देण्यात आले असले तरी विद्यापीठात बहिणाबाईंचा पुतळा नाही ही बाब लक्षात घेऊन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी येथे भव्य पुतळा उभारण्यात येईल अशी घोषणा केली होती. या अनुषंगाने त्यांनी जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन २३-२४ मधून निधी प्रदान करण्यात यावा अशी मागणी दिनांक ३१ जानेवारी २०२३ च्या पत्रान्वये केली होती. यासाठी त्यांनी सतत पाठपुरावा देखील केला होता.

या अनुषंगाने, राज्य शासनाच्या नियोजन विभागाचे उपसचिव सं. ह. धुरी यांनी या प्रस्तावाला मान्यता दिला आहे. या आशयाचे पत्र जिल्हा नियोजन समितीचे सचिव तथा जिल्हाधिकारी जळगाव यांना पाठविले आहे. यात जिल्हा वार्षिक योजना २०२३-२४ मधून बचत केलेल्या निधीचे पुर्नविनियोजन करून इतर जिल्हा योजनेतून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या परिसरात बहिणाबाई चौधरी यांचा पुतळा उभारण्याची परवानगी विशेष बाब म्हणून देण्यात येत असल्याचे नमूद केले आहे. यामुळे भव्य पुतळ्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

दरम्यान, या संदर्भात पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, विद्यापीठात दिलेला शब्द पाळला असून बहिणाबाई चौधरी यांच्या पुतळ्याचे काम मार्गी लागणार असल्याचा मला अतीव आनंद आहे. पुतळा उभारण्या बाबतची प्रक्रिया आता लवकरच मार्गी लावणार असून निधीची कमतरता भासू देणार नसल्याची माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.

Exit mobile version