Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

…खापरेताई जरा तुमच्या पक्षाकडे बघा ! – महिला राष्ट्रवादीचा पलटवार

जळगाव प्रतिनिधी । जळगावातील अत्याचार प्रकरण उघडकीस आल्यानंतर संबंधीत महिला पदाधिकार्‍याचा राजीनामा घेण्यात आला आहे. यामुळे भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्षा उमाताई खापरे यांनी आमच्यावर टीका करण्याऐवजी आपल्याकडे पहावे असा सल्ला देत महिला राष्ट्रवादीने त्यांच्यावर पलटवार केला आहे.

याबाबत वृत्त असे की, भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्षा उमाताई खापरे यांनी आज पत्रकार परिषदेत जळगावातील एका मुलीवरील अत्याचाराच्या प्रकरणाचा संदर्भ घेऊन राष्ट्रवादीवर टीका केली. याला महिला राष्ट्रवादीने एका पत्रकाच्या माध्यमातून जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

या पत्रकात म्हटले आहे की, भाजपा महिला प्रदेशाध्यक्षा श्रीमती उमाताई खापरे यांनी आज पत्रकार परिषेदेतराष्ट्रवादी काँग्रेस वर टीका केली. मात्र टीका करण्याआधी आपल्या पक्षाची महिलांसंदर्भातील परंपरा त्या विसरल्या. जळगावात महिला शहराध्यक्षांच्या मुलावर बलात्काराचा आरोप झाल्याबरोबर पक्षाने त्या महिला पदाधिकार्‍यांचा त्वरित राजीनामा घेतला. वास्तविक गुन्हा त्यांचा मुलाने केला होता. त्यात त्या महिला पदाधिकार्‍यांचा काहीच दोष नाहीये. कारण कुठल्याही माउलीला वाटत नाही की आपल्या मुलाने असे भ्याड कृत्य करावे. तरी राष्ट्रवादीने खबरदारी म्हणून संबंधित पदाधिकार्‍यांचा राजीनामा घेतला. कारण राष्ट्रवादी पक्ष जबाबदार पक्ष आहे. आम्ही नैतिकतेचे सर्व नियम पाळतो.

या पत्रकात पुढे म्हटले आहे की, राष्ट्रवादीवर आरोप करताना खापरे ताई मात्र आपल्या पक्षाची उदाहरणे द्यायला विसरल्या. आसाम मधील भाजपा पदाधिकारी कामरूल हक चौधरी, उत्तरप्रदेश चेतत्कालीन गृह राज्यमंत्री स्वामी चिन्मयानंद, प्रदेश भाजपाचे पदाधिकारी रघुनंदनराव, आपल्याच मुलीवर सातत्याने आठ वर्षे अत्याचार करणारा
पंजाबातील भाजप पदाधिकारी अशोक तनेजा, हरियाणातील भाजपा नेता सुरेंद्र बरवाला यांच्या मुलाने केलेले प्रताप याचा त्यांना विसर पडला आहे. यासोबत कठुवा, उन्नाव च्या घटना खापरेताई कशा विसरल्या ? असा सवाल या पत्रकात विचारण्यात आला आहे.

यात पुढे नमूद करण्यात आले आहे की, हे आरोप तर स्वतः भाजपाच्या पदाधिकार्‍यांवर झाले आहेत. त्याबद्दल त्या चूप होत्या. इतकेच काय महाराष्ट्रातील भाजपा आमदार राम कदम यांनी जाहीररित्या मुलींना पळवून आणण्याची वल्गना केल्या त्या भाजपाच्या ध्येय-धोरणात आहेत काय ? आणि नसतील तर खापरेताईंनी त्यांचा निषेध केला आहे काय ? असे प्रश्‍न यात विचारण्यात आले आहेत. जळगावमध्ये घडलेली घटना निंदनीय आहे. आरोपींना कडक शिक्षा ही व्हायलाच हवी या मताचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. आणि राज्यातील पोलीस यंत्रणा ही त्यासाठी सक्षम आहे. श्रीमती खापरेताईंनी चिंता करू नये असा सल्ला यात देण्यात आला आहे.

या पत्रकावर महिला राष्ट्रवादीच्या लता ताई मोरे, ममता तडवी, जयश्री पाटील, अर्चना कदम, कमल पाटील, शकुंतला धर्माधिकारी यांच्यासह सर्व महिला पदाधिकार्‍यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

Exit mobile version