मारहाणीत महिलेचा मृत्यू : खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील दापोरा येथील महिलेस झालेल्या मारहाणीत तिचा मृत्यू झाला असून या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे.

या संदर्भातील माहिती अशी की, तालुक्यातील दापोरा येथील प्रमिलाबाई दिलीप सोनवणे (वय ५७, रा. दापोरा) यांचा मुलगा विजय सोनवणे हे बुधवारी सकाळी १०.३० वाजता गणपती चौकात दुचाकी लावून मोबाइलवर बोलत होते. त्यावेळी एमएच-१९, डीवाय-४७१३ या क्रमांकाची कार दापोरा गावात येत होती. यावेळी अज्ञात दुचाकीस्वार कारला कट मारून निघून गेला. चालकाने समोर जाऊन कार थांबवली. विजय यांच्याकडे बघून कारचालकाने शिवीगाळ केली. विजय यानेच कट मारल्याचा त्याचा समज झाला. त्यानंतर कारचालक गावातील लग्नस्थळी निघून गेला. यानंतर दुपारी साडेबाराच्या सुमारास गावातील अशोक रमण नाईक, मंगलसिंग हिलाल सोनवणे, कारचालक ज्ञानेश्वर प्रकाश मालचे व त्याच्यासोबत रमेश सुदाम मोरे यांनी सोनवणे कुटुुंबीयांना त्यांनी शिवीगाळ केली. विजय व त्यांचा भाऊ अरुण सोनवणे हे त्यामुळे घराबाहेर आले. त्यावेळी चौघांनी त्यांना चापटा, बुक्क्यांनी मारहाण केली. भांडणाचा आवाज ऐकून दोघांच्या पत्नी व आई प्रमिलाबाई एकत्र घरातून बाहेर आल्या. त्यांनी भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला. या मारहाणीत प्रमिलाबाई यांना धक्का लागला. त्यामुळे त्या जमिनीवर खाली डोक्यावर पडल्याने त्या बेशुद्ध झाल्या. त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र मेंदूत रक्तस्राव झाल्यामुळे प्रमिलाबाई यांचा मृत्यू झाला.

प्रमिलाबाई यांच्या मृत्यूस चौघे जबाबदार असल्याची फिर्याद मुलगा विजय सोनवणे यांनी तालुका पोलिस ठाण्यात दिली. या फिर्यादीत संशयितांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. शवविच्छेदन अहवालानुसार गुन्हा दाखल करण्यात येईल,असे पोलिसांनी त्यांना सांगितले आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Protected Content