Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सावधान : अजून तीन दिवस मुसळधार वादळी पाऊस !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येत्या तीन दिवसात अजून वादळी वार्‍यांसह मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला असून यानुसा जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा अलर्ट जारी केला आहे.

परतीच्या मोसमी पावसाने राज्यात ठिकठिकाणी थैमान घातल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात देखील काही दिवसांपासून पाऊस सुरू असून येत्या तीन दिवसात म्हणजे २३ सप्टेंबर पर्यंत जिल्ह्यात ठिकठिकाणी वादळी वार्‍यांसह मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने देखील जिल्हावासियांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

या संदर्भात निवासी उपजिल्हाधिकारी तथा तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल पाटील यांनी निर्देश जारी केले आहेत. यात म्हटले आहे की, दिनांक १९ ते दिनांक २३ सप्टेंबर या कालावधीत रोजी ताशी ३० ते ४० किलोमिटर वादळी वारा व विजांच्या कडकडाटांसह पाऊस होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याकडुन प्राप्त झालेली आहे. जिल्ह्यातील सर्व प्रमुख नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता असुन नद्यांवरील लहान व मोठे प्रकल्पांचा धरणसाठा १००% पुर्ण भरलेला आहे. त्यामुळे सर्व लहान व मोठे घरणांच्या खालील तसेच धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील नदीच्या पाणीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे.

त्याअनुषंगाने जिल्ह्यातील शेतकरी व नदीकाठच्या गावातील नागरीकांनी सतर्क राहण्याचा इशारा देण्यात यावा. शेतीमालाचे नुकसान टाळण्यासाठी शेतकर्‍यांनी आपला शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवण्याची सुचना द्यावी. बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रिसाठी आणला असेल अशा शेतमालाचे नुकसान होणार नाही याबाबत दक्षता घेण्याचे सुचित करावे. सदर परतीचा पाऊस ताशी ३० ते ४० किलोमिटर वादळी वारा व विजांच्या कडकडाटांसह कोसळणार असल्याने पावसा दरम्यान विजा व अतिवृष्टी पासुन बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घेणेबाबत तसेच प्रसंगी झाडाखाली, विजवाहीनी अथवा ट्रान्सफार्मर जवळ थांब नये असे यात नमूद केले आहे. याबाबत दक्षता घेण्यासाठी दवंडीच्या माध्यमातुन वेळोवेळी सतर्क करणेबाबत कार्यवाही करावी.

दरम्यान, येत्या तीन दिवसात संबंधीत विभागांनी आपल्या अखत्यारीतील सर्व यंत्रणा तसेच मान्सुन काळासाठी स्थापन करण्यात आलेल्या अहोरात्र सुरू राहणार्‍या नियंत्रण कक्षात नियुक्त अधिकारी कर्मचारी यांना यथायोग्य निर्देश देण्याची कार्यवाही करावी असे देखील निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील यांनी आपल्या निर्देशांमध्ये म्हटले आहे.

Exit mobile version