Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ग्रामस्थांनी पकडला दुचाकी चोर

जळगाव प्रतिनिधी | तालुक्यातील आसोदा येथून दुचाकी चोरून पलायन करणार्‍या एका चोरट्याला ग्रामस्थांनी पकडून तालुका पोलीस स्थानकात जमा केले आहे.

याबाबत वृत्त असे की, गजू हरीसिंग बारेला (वय २३, रा. वाघझिरा, ता. यावल) याच्यासह तीन चोरटे दुचाकीने शनिवारी मध्यरात्री आसोदा गावात आले. त्यांनी महाजनवाडा परिसरात राहणारे सचिन वासुदेव चौधरी यांची दुचाकी (एमएच १९ सीजी ०६६०) चोरली. या दुचाकीची चोरी केली. दुचाकीत पेट्रोल नसल्याने त्यांनी आपल्या बाईकला टोचण करुन ती ओढण्यास सुरुवात केली. याचवेळी गावाबाहेरील लवकी पुलाजवळ मोरीचे काम करणारे कॉन्ट्रॅक्टर परिक्षीत पाटील, यश पाटील व उल्हास पाटील, विजय पाटील हे चौघे दोन ट्रॅक्टर घेऊन जात होते. त्यांना संशय आल्याने त्यांनी लागलीच काही अंतर पुढे असलेेल्या दुसर्‍या ट्रॅक्टरवरील यश पाटील यांना फोन करुन माहिती दिली.यामुळे यश व परीक्षीत पाटील यांनी रस्त्यावर ट्रॅक्टर आडवे लावून चोरट्यांना अडवले. यावेळी एका चोरट्याने चॉपर काढून या तरुणांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या वेळी यश पाटील यांनी देखील लोखंडी टॉमी काढून त्यांना प्रत्युत्तर दिल्याने घाबरुन तीन पैकी दोन चोरट्यांनी दुचाकी सोडून अंधाराचा फायदा घेत पळ काढला. तर बारेला याला तरुणांनी ताब्यात घेतले. तालुका पोलिसांनी या चोरट्यास अटक केली असून त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर सचिन चौधरी यांना त्यांची दुचाकी परत देण्यात आली आहे.

सचिन चौधरी यांचे वडील वासुदेव चौधरी हे मंदिरात जाण्यासाठी पहाटे ४.३० वाजता झोपेतून उठले होते. या वेळी घराबाहेर दुचाकी नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांची सचिन चौधरी यांना झोपेतून उठवून विचारपुस केली. दुचाकी चोरीस गेल्याचे निष्पन्न झाल्यानंतर चौधरी पिता-पुत्रांनी पहाटेच गावात दुचाकी शोधण्याचा प्रयत्न केला होता. सुदैवाने तासभराच्या आतच त्यांची चोरीस गेलेली दुचाकी परत मिळाली.

Exit mobile version