Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगाव व बुलढाण्यास दुष्काळग्रस्त जिल्हा घोषीत करा : खा. रक्षा खडसे

 

 

मुक्ताईनगर प्रतिनिधी । जळगाव आणि बुलढाणा जिल्ह्यात यंदा आतापर्यंत हवा तसा पाऊस झाला नसल्याने या दोन्ही जिल्ह्यांना दुष्काळग्रस्त म्हणून घोषीत करण्यात यावे अशी मागणी खासदार रक्षाताई खडसे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली आहे.

याबाबत वृत्त असे की, संपूर्ण महाराष्ट्राप्रमाणे जळगाव व बुलडाणा जिल्ह्यात हवामान अंदाज वेधशाळेने वर्तविल्या प्रमाणे कुठेही पाहिजे तसा पाऊस झालेला नसून, जून महिन्याच्या सुरवातीपासूनच परिसरातील शेतकर्‍यांनी पिकांची पेरणी करून टाकली होती. जुलै महिना उजाडला तरी सुद्धा अजून पावसाचे कुठल्याही प्रकारचे हवामान दिसत नाही. पावसाच्या आशेवर नाईलाजास्तव दुबार पेरणी करून पावसा अभावी संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांना दिलासादेण्यासाठी जळगांव व बुलडाणा जिल्ह्यास दुष्काळ ग्रस्त घोषित करावे असे पत्र खासदार रक्षाताई खडसेंनी दिलेले आहे.

या पत्रात म्हटले आहे की, पेरणी करून टाकलेल्या शेतकर्‍यांचे आधीच पावसाअभावी आर्थिकदृष्ट्या कंबरडेच मोडले गेलेले आहे. आधीच कोरोना महामारीचा सामना करीत शेतकर्‍यांनी बँकेतुन कर्ज काढून मोठ्या कष्टाने पिकांची लागवड केली होती. जळगाव व बुलडाणा जिल्हा वगळता संपूर्ण महाराष्ट्रात काहीना काही पाऊस होत आहे. या पावसाच्या आशेवर पुन्हा तडजोड व उसनवारी करून शेतकर्‍यांनी दुबार पेरणी केलेली असून जुलै महिना अर्धाझाल्यावरही असून जळगांव व बुलडाणा जिल्ह्यात पाहिजे तसा पिकांयोग्य पाऊस पडलेला नाही. पावसा अभावी दुबार पेरणी करूनही शेतकर्‍यांच्या हाती काहीही येणार नाही असे वाटत आहे, असे खासदार रक्षाताई खडसेंनी निवेदनात म्हटले आहे.

निवेदनात पुढे नमूद केले आहे की, दुबार पेरणी करूनही पावसा अभावी आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून, शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकार कडून जळगाव व बुलडाणा जिल्ह्यास दुष्काळ ग्रस्त घोषित करण्यात यावे अशी मागणी वजा विनंती खासदार रक्षाताई खडसेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच जळगांव व बुलडाणा जिल्ह्यांचे पालकमंत्री गुलाबराव पाटील व राजेंद्र शिंगणे यांच्याकडे केली आहे.

Exit mobile version