Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मिश्रा बंधूंना दारू पुरवणारे पोलीस निलंबीत

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | बनावट गुन्हा दाखल करण्याच्या प्रकरणात आरोपी असणार्‍या मिश्रा बंधूंना दारू पुरवल्याच्या कारणावरून दोन पोलीस कर्मचार्‍यांना जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी निलंबीत केले आहे.

या संदर्भातील वृत्त असे की, शाहू नगरातील बालकदास बाबा आणि त्यांच्या सहकार्‍यांनी बनावट गुन्ह्यात अडकवण्याचे कृत्य काही दिवसांपूर्वी उघडकीस आले होते. यात राजेश रोहितलाल मिश्रा आणि रामेश्‍वर मिश्रा यांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले होते. या दोघांनी त्यांच्या गाडीचा ड्रायव्हर इम्रानखान मुस्तकीन खान याला खोटी फिर्याद द्यायला लावली होती. तथापि, चौकशीत हा बनाव समोर येथून मिश्रा बंधूंना अटक करण्यात आली. त्यांची पोलीस लॉकअपमध्ये चांगलीच बडदास्त ठेवण्यात आली असून चक्क पोलीसांनीच त्यांना मद्य पुरवल्याची तक्रार करण्यात आली होती.

जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी याची गंभीर दखल घेऊन चौकशी केली. यात मिलींद सोनवणे आणि करूणासागर जाधव यांनी राजेश मिश्रा आणि रामेश्‍वर मिश्रा यांना पोलीस स्थानकातच पाण्याच्या बाटलीतून दारू दिल्याचे दिसून आले. याची दखल घेऊन डॉ. प्रवीण मुंढे यांनी या दोन्ही कर्मचार्‍यांना कर्तव्यात कसूर केल्याबद्दल निलंबीत केले आहे. निलंबनाच्या काळात त्यांना जिल्हा पोलीस मुख्यालयात हजेरी लावण्याचे अनिवार्य करण्यात आले आहे.

मिश्रा बंधू हे वाळू माफिया म्हणून ओळखले जात असून त्यांच्यावर आधी देखील अनेक गुन्हे आहेत. यात आता ते या नवीन प्रकरणामुळे पुन्हा गोत्यात आले आहेत.

Exit mobile version