Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

वृध्दाला फसवणार्‍यांना दिल्लीतून अटक

जळगाव प्रतिनिधी | वयोवृध्द व्यक्तीला आमीष दाखवून तब्बल ६१ लाख रूपयांचा गंडा घालणार्‍या दोघा भामट्यांना सायबर शाखेच्या पथकाने गजाआड केले आहे.

सेवानिवृत्त कृषी अधिकारी टिकाराम शंकर भोळे (वय ८८, रा. विद्युत कॉलनी) यांना २०१७ मध्ये दीपिका शर्मा नावाच्या महिलेने मोबाइलवर संपर्क साधून स्टार हेल्थ कंपनीतून बोलत असल्याचे सांगितले. तुमचे एलआयसी कंपनीकडे १ लाख ९५ हजार रुपये शिल्लक आहेत. ही रक्कम परत हवी असल्यास मी सांगेन तशी प्रक्रिया पूर्ण करावी लागेलफ असे सांगून पत्नीचे आधारकार्ड, पॅन कार्ड, दोन फोटो व २४ हजार २७० रुपयांचा धनादेश त्यांच्याकडून पोस्टाने मागवून घेतला. याचप्रमाणे रॅल हेल्थ इन्शुरन्स कंपनीत ४ लाख ७५ हजार रुपये एवढी रक्कम बाकी असल्याचे सांगून ४० हजार रुपयांची मागणी त्यांनी केली. या माध्यमातून समोरच्यांनी त्यांना तब्बल ६१ लाख ७९ हजार ५९३ रूपयांचा गंडा घातला.

या अनुषंगाने टिकाराम शंकर भोळे यांनी सायबर पोलीस स्थानकात तक्रार दिली होती. सायबरच्या पथकाने संबंधित बँक अकाउंट, पत्ते यांची तांत्रिक चौकशी केली. यावरून संबंधित भामटे दिल्लीत असल्याची माहिती मिळाली. पोलिस निरीक्षक लीलाधर कानडे, उपनिरीक्षक अंगद नेमाने, प्रवीण वाघ, दिलीप चिंचोले, गौरव पाटील, पंकज वराडे, दीपक सोनवणे, श्रीकांत चव्हाण, सचिन सोनवणे यांच्या पथकाने दिल्ली येथून अमितसिंग पिता देवेंद्र प्रकाश सिंग उर्फ अमित शर्मा पिता मुलचंद शर्मा (रा. मोतीराम रोड, मानसरोवर पार्क, शाहदरा नॉर्थ इस्ट दिल्ली) व लखमी चंद पिता राजेश कुमार (जोहरीपूर, दिल्ली) या दोघांना ताब्यात घेतले. त्यांना कोठडी सुनावण्यात आली आहे.

Exit mobile version