उदय पाटलांचा धक्का : लोकसहकारचे हे दोन सदस्य लावले गळाला !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | ग. स. सोसायटीच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीआधी हाय व्होल्टेज ड्रामा घडला असून सहकारचे सर्वेसर्वा उदय पाटील यांनी लोकसहकारच्या दोन सदस्यांना फोडल्याने निवड प्रक्रियेत ट्विस्ट येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

म्हणजेच बुधवारी लोकसहकार आणि प्रगती शिक्षक सेनेच्या पॅनलने संयुक्त पत्रकार परिषद घेऊन सत्ता स्थापन करण्याचा दावा केला. यात अध्यक्षपदी रावसाहेब पाटील तर उपाध्यक्षपदी अनिल गायकवाड हे अर्ज भरणार असल्याची माहिती देखील देण्यात आली.

यानंतर सायंकाळी सहकार गटाचे नेते उदय पाटील एक फोटो सोशल मीडियात व्हायरल करत आपल्यासोबत अकरा ही मॅजिक फिगर असल्याचे जाहीर केल्याने आजची अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवड चुरशीची होणार असल्याचे संकेत मिळाले होते. या अनुषंगाने आज दुपारी साडेबारा वाजेपासून सर्व संचालक क्रमाक्रमाने ग. स. सोसायटीमध्ये दाखल झाले. दुपारी एक वाजेपासून निवडणूक प्रक्रिया सुरू झाली.

दरम्यान, साडेबारा वाजेच्या सुमारास दोन्ही पॅनलचे संचालक सोसायटीत निवड प्रक्रियेसाठी दाखल करत असतांनाच लोकसहकारचे दोन सदस्य हे सहकार पॅनलच्या संचालकांसोबत आल्याने एकच खळबळ उडाली. लोकसहकारच्या समर्थकांनी आक्रमक पवित्रा घेत या दोघांना सभागृहात जाऊ देणार नसल्याची भूमिका घेतली. यामुळे येथे प्रचंड गोंधळ उडाला. बराच वेळ संचालकांना मध्ये जाण्यापासून रोखण्यात आले. अखेर प्रचंड पोलीस बंदोबस्तात एक वाजता सहकार गटाचे सर्व संचालक लोकसहकारच्या दोन सदस्यांसह सभागृहात दाखल झाले. सभागृहात जाण्याआधी मनोज पाटील म्हणाले की, आमच्या दोन गटाला आमीष देऊन रात्री त्यांना पळवून नेले. यात रवींद्र सोनवणे भडगाव आणि ज्ञानेश्‍वर सोनवणे जळगाव हे दोन सदस्य फुटल्याची माहिती त्यांनी दिली. यामुळे सहकारचे सर्वेसर्वा उदय पाटील यांनी विरोधकांना जोरदार हादरा दिल्याचे दिसून आले आहे.

Protected Content