Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ट्रॅक्टरची कारला धडक : दोन जण ठार

जळगाव प्रतिनिधी | शहरातील कानळदा रोडवरील केसी पार्कजवळ भरधाव वेगाने धावणार्‍या ट्रॅक्टरने दिलेल्या धडकेत कारमधील दोघे ठार झाल्याची दुर्घटना घडली आहे.

या संदर्भात मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, भादली येथील सपकाळे दांपत्याच्या मुलीचे सासर तालुक्यातील भोकर हे आहे. जावयाची प्रकृती खराब असल्याने सपकाळे दांपत्य त्यांना सेंधवा येथे उपचारासाठी घेऊन जाणार होते. त्यासाठी गुरुवारी सकाळी ६ वाजता सपकाळे दांपत्याने पुतण्याची कार (एमएच १४ एफसी ४५५०) घेतली. कार चालवण्यासाठी संदीप सोनवणेला सोबत घेतले. हे तिघे जण सुरुवातीला भोकर येथे जाणार होते. तेथून जावयास घेऊन सेंधवा जाण्याचे त्यांचे नियोजन होते.

दरम्यान सकाळी ६.३० वाजता कानळदा रस्त्यावरील केसी पार्कजवळ ते आले असता शेतातून मुख्य रस्त्यावर येत असलेल्या ट्रॅक्टरवर कार धडकली. या भीषण अपघातात कार व ट्रॅक्टरचे धूड चक्काचूर झाले. कारचालक संदीप व मागे बसलेल्या लताबाई जागीच ठार झाल्या. तर त्यांचे पती रामकृष्ण व ट्रॅक्टरचालक बापू सपकाळे हे दोघे गंभीर जखमी झाले. अपघाताच्या आवाजामुळे परिसरातील नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड, रतन गिते यांनी घटनास्थळी जाऊन जखमींना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलवले. अपघाताची माहिती मिळताच भादली गावातील लोकांनी रुग्णालयात गर्दी करीत दु:ख व्यक्त केले. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. मृत लताबाई यांच्या पश्चात पती, एक मुलगा, सून, दोन नाती, मुलगी व जावई असा परिवार आहे. तर मृत संदीपच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार अाहे.

Exit mobile version