Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

तीन कामगाराच्या मृत्यूप्रकरणी पाच जणांवर गुन्हा; तीन जणांना अटक

जळगाव प्रतिनिधी । अयोध्यानगरातील समृध्दी केमिकल कंपनीत सांडपाणी व वेस्टेज केमिकल्स साठविण्याच्या टाकीत तीन जणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना काल शनिवारी दुपारी घडली होती. तिघांच्या मृत्यूप्रकरणी एमआयडीसी पोलीसात पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्यातील तीन जणांना आज रविवारी अटक केली आहे.

सुबोध सुधाकर चौधरी, सुनिल सुधाकर चौधरी आणि सुयोग सुधाकर चाधरी असे अटक केलेल्या संशयित आरोपींचे नावे आहे. सविस्तर वृत्त असे की, अजिंठा चौफुलीला लागूनच असलेल्या आयोध्यानगर रस्त्यावरील जुन्या एमआयडीसीतील ए-सेक्टरमध्ये प्लॉट क्र्. ८४, ८५ मध्ये सुबोध सुधाकर चौधरी व सुयोग सुधाकर चौधरी यांच्या मालकीची समृद्धी केमिकल्स नावाची रासायनिक खत निर्मिती करण्याची कंपनी आहे. अपर्णा सुयोग चौधरी यांच्या नावावर ही कंपनी आहे. यात २० ते २५ मजूर रोजंदारीवर कामाला आहेत. शनिवारी कंपनीला सुट्टी असल्याने मालक सुबोध चौधरी यांनी मयूर विजय सोनार व दिलीप सोनार यांना कंपनीचे वेस्टेज केमिकल्स व सांडपाणी साठवण्याची टाकी साफसफाई करण्यास सांगितले होते. 

या टाकीत केमिकल मिश्रित चिखल व गाळ होता. टाकीत साफसफाई करीत असताना मयुर विजय सोनार (३५, रा. कांचन नगर)  यांचा वरुन पाय घसरला व तो या सांडपाण्यात बुडाले. हा प्रकार लक्षात येताच दिलीप अर्जुन सोनार (५४, रा. कांचन नगर, मुळ रा. खिरोदा, ता.रावेर)  यांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. टाकीतून हात धरून ओढत असताना कोळी हेच खाली खेचले गेले व त्यामुळे ते देखील टाकीत बुडाले. ठेकेदार रवींद्र उर्फ गोटू झगडू कोळी (३२, रा. चिंचोली, ता.यावल) हे दोघांना वाचविण्यास गेले असता, तेही टाकीत बुडाला. अवघ्या दहा मिनिटात तिघे या टाकीत बुडाले. इतर कामगारांनी तातडीने धाव घेऊन तिघांना बाहेर काढले. मालवाहू टेम्पो मधून जिल्हा रुग्णालयात आणले असता तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन अहिरे यांनी त्यांना मृत घोषित केले होते. एमआयडीसी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. 

अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आल्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक रामकृष्ण पाटील यांची पंचनामा तसेच चौकशी केली होती. चौकशीत संबंधित केमिकलचे सांडपाणी असलेल्या चेंबरमध्ये विषारी वायु तयार होतो. हे माहित असतांनाही कंपनीच्या मालकांनी कुठलेही सुरक्षेची उपाययोजना न करता, तसेच टाकी स्वच्छ करणार्‍या कामगारांना सुरक्षेच्या दृष्टीने कुठलेही कपडे अथवा साहित्य न देता चेंबरमध्ये उतरविले. व त्यात त्यांचा मृत्यू झाला असे चौकशीत निष्पन्न झाल्यानंतर पोलीस उपनिरिक्षक रामकृष्ण पाटील यांच्या फिर्यादीवरुन शनिवारी रात्री एक वाजेच्या सुमरास सुबोध सुधाकर चौधरी, हिरा सुबोध चौधरी, अपर्णा सुयोग चौधरी, सुनील सुधाकर चौधरी, सुयोग सुधाकर चौधरी सर्व रा. सागर नगर, एमआयडीसी या पाचही जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. यात सुबोध चौधरी, सुनील चौधरी व सुयोग चौधरी या तिघांना अटक करण्यात आली आहे. 

 

Exit mobile version