गुरांचे मांस वाहून नेणार्‍या टेम्पो चालकाला अडवून मारहाण

जळगाव प्रतिनिधी | गुरांचे मांस वाहून नेणार्‍या टेंपोचा पाठलाग करून त्याला अडवत, चालकाला मारहाण केल्याची घटना रात्री कालींका माता चौकात घडली.

याबाबत वृत्त असे की, एका टेंपोमधून गुरांचे मांस वाहून नेत असल्याची माहिती नशिराबाद येथील काही तरूणांना मिळाली. त्यांनी या टेंपोचा पाठलाग सुरू केला. दरम्यान, यासंदर्भात जळगाव येथे काही जणांना याची माहिती देण्यात आली. यामुळे हा टेंपो रात्री पावणेअकराच्या सुमारास कालींका माता चौकात अडविण्यात आला.

येथे तरूणांनी टेम्पोत प्लास्टिकच्या ड्रममध्ये गोवंशाचे मांस असल्याचे आढळून आले. यामुळे तरुणांनी टेम्पोच्या काचा फोडल्या आणि चालकास मारहाण केली. यामुळे प्रचंड तणाव निर्माण झाला होता. तसेच महामार्गावर वाहतुकीची कोंडी झाली होती. एमआयडीसी पोलिस, दंगा नियंत्रण पथकाने घटनास्थळी धाव घेत नियंत्रण मिळवले. टेम्पो चालकास ताब्यात घेतले. दरम्यान, याप्रसंगी एक कार ही टेंपोच्या पुढे टेहळणी करण्यासाठी धावत असल्याचे दिसून आल्याने काही जणांनी कारचा पाठलाग केला. मात्र कार चालक पळून जाण्यात यशस्वी ठरला.

या संदर्भात रात्री उशिरापर्यंत एमआयडीसी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Protected Content