Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शिक्षकाच्या लढ्याला यश : पार्टटाईम सेवा ग्राह्य धरून पेन्शन अदा करण्याचे निर्देश

जळगाव प्रतिनिधी | आपण केलेली पार्ट टाईम सेवा ग्राह्य धरून पेन्शन मिळावे या मागणीसाठी सेवानिवृत्त शिक्षक आनंद सपकाळे यांच्या न्यायालयीन लढ्याला यश आले असून त्यांच्या मागणीनुसार पेन्शन अदा करण्याचे उच्च न्यायालयाने दिले आहेत.

या संदर्भात वृत्त असे की, एरंडोल तालुक्यातील उत्राण येथील जे. एस. जाजू विद्यालयातून आनंद सपकाळे सपकाळे हे शिक्षक सेवानिवृत्त झाले आहेत. या शाळेत त्यांची १६ वर्ष ७ महिने अशी कायम सेवा तर ३ वर्ष १५ दिवस इतकी अर्धवेळ ( पार्टटाईम सेवा ) झालेली होती. या अनुषंगाने त्यांनी आपली पार्ट टाईम सेवा ग्राह्य धरून पेंशन प्रस्ताव अकाऊंट जनरल मुंबई यांच्याकडे पाठवला होता. तथापि सदर कार्यालयाने पार्ट टाईम सेवेचा कालखंड पेन्शन साठी ग्राह्य धरण्यास नकार कळविला होता.
याबाबत आनंद सपकाळे यांनी ऍड सुमित सपकाळे यांच्या मार्फत औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती. यात ऍड. सुमित सपकाळे यांनी केलेला युक्तीवाद मान्य करून न्यायमूर्ती रवींद्र घुगे व एस जी मेहेरे यांच्या खंडपीठाने आनंद सपकाळे यांची ३ वर्ष १५ दिवस इतक्या पार्टटाईम सेवे पैकी१८ महिन्यांची पूर्णकाळ सेवा पेन्शन मध्ये ग्राह्य धरून फरक, ग्रॅज्युटी व इतर पेंशन्स बेनिफिट दिनांक ३१ जानेवारी २०२२ पावेतो याचिकाकर्ते आनंद सपकाळे यांना द्यावे असे आदेश दिले आहेत.

आनंद सपकाळे यांनी आपल्यावरील अन्यायाच्या विरोधात न्यायालयात लढा देऊन यात विजय मिळविल्याची बाब अतिशय लक्षणीय अशीच आहे. सदर निकालामुळे पार्ट टाईम सेवा पण पेन्शन साठी लाभदायक असू शकते ही बाब अधोरेखित झाली आहे. याचा इतर अनेक शिक्षकांना लाभ होण्याची शक्यता आहे.

Exit mobile version