Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बहिणाबाई चौधरींवर लवकरच टपाल तिकिट : खा. उन्मेष पाटलांचा पुढाकार

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्यावर लवकरच टपाल तिकिट काढण्यात येणार असून यासाठी खासदार उन्मेषदादा पाटील यांनी पुढाकार घेतला आहे.

खान्देश कन्या कवियीत्री बहिणाबाई चौधरी यांच्या नावाने लवकरच टपाल तिकीट प्रकाशित करावे. यासाठी खासदार उन्मेषदादा पाटील यांनी केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री ना. अश्विन वैष्णव यांची भेट घेतली.कवियीत्री बहिणाबाई चौधरी यांच्या जिवनावरील माहिती सादर करीत खासदार पाटील यांनी टपाल तिकिटाचा प्रस्ताव केंद्राकडे सादर केला. मंत्री महोदयांनी प्रस्तावाच्या अनुषंगाने टपाल तिकिट प्रकाशित करण्यास हिरवा कंदील दिल्याने गेल्या अनेक वर्षापासून बहुप्रतिक्षेत असलेल्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या नावाने पहिल्यांदाच टपाल तिकीट प्रकाशित होणार आहे.

देशाचे माहिती तंत्रज्ञान मंत्री ना.अश्विन वैष्णव यांच्याकडे खान्देशकन्या ज्येष्ठ कवियित्री बहिणाबाई चौधरी यांच्यावर तातडीने टपाल तिकीट प्रकाशित करण्याबद्दल विनंती केली आपल्या निवेदनात खासदार उन्मेषदादा पाटील यांनी नमूद केले आहे जळगाव येथून जवळच असलेल्या आसोदा येथे जन्मलेल्या खान्देश कन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांनी मराठी साहित्य विश्वात अशिक्षित असताना देखील आपल्या रसाळ, मधाळ आणि जीवनाचा सार सांगणार्‍या कवितामुळे एक आगळे वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्यांच्या कविता मराठी काव्यसृष्टीचा चमत्कार म्हणून युग कवियित्री निसर्गकन्या बहिणाबाई चौधरी यांना ओळखले जाते. निरक्षर असल्या तरी कवितेतून प्रकट होणारे तत्वज्ञान मोठमोठ्या तत्वज्ञान्यांनाही लाजवणारे आहे. आपल्या पतीच्या निधनानंतर खंबीरपणे संसाराचा गाडा ओढतांना बहिणाबाई एक आदर्श स्त्रीचे प्रतीक होत्या व त्याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असताना एखादी अडाणी आणि निरक्षर स्त्री पूर्णपणे उध्वस्त झाली असती मात्र त्यांच्या कवितेतून संसारी स्त्रीची सुखदुःखे जगत असताना अंतः स्फूर्तिने बहिणाबाईंचे काव्य स्फुरले आहे. शेती हा मुख्य व्यवसाय असताना एकत्र कुटुंब पद्धती, रीतीभाती, सण-उत्सव, स्त्रीजिवन, सासर-माहेर, जातीची उतरंड समकालीन वास्तवाचे भिन्न भिन्न रूपे बहिणाबाईंच्या कवितेतून सार्‍या विश्वाला प्रत्ययास आले असून कवितेतून येणारे संदर्भ जगाला विचार करायला लावणारे आहेत. त्यांच्या कवितेतून सोशिकपणाचे, खंबीरतेचे दर्शन घडत असून हा विचार समस्त महिलांना उभारी देणारा असल्याचे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

या निवेदनात पुढे म्हटले आहे की, आदर्श थोर कवयित्री बहिणाबाई यांचा जन्म माझ्या मतदारसंघातील आसोदा येथे झाल्याचा माझ्यासह समस्त खान्देशवासियाना सार्थ अभिमान आहे. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांचे स्मारक देखील दुर्लक्ष आहे. याबाबत सातत्याने पत्रव्यवहार केला आहे. मात्र राज्य शासनाची उदासीनतेमुळे आज पावेतो कामाला गती मिळाली नाही. आज या पत्राद्वारे आपणास विनंती करतो की खान्देशकन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या नावाने टपाल तिकीट प्रकाशित करावे जेणेकरून या निसर्गकन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या अहिराणी बोली भाषेतील कवितेचा हा अद्भुत चमत्कार जगभरात पोहोचण्यास मदत होणार आहे. तीन डिसेंबर हा त्यांचा स्मृतिदिन असून ३ डिसेंबर १९५१ रोजी त्यांनी जगाचा निरोप घेतला होता यामुळे कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या नावाने केंद्र सरकारने तातडीने टपाल तिकीट जारी करावे व त्यांना आदरांजली द्यावी. अशी विनंती खासदार उन्मषदादा पाटील यांनी ना. अश्विन वैष्णव यांचेकडे या निवेदनासह प्रत्यक्ष भेटून केली आहे.

Exit mobile version