Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ईडीचा ‘काऊंटर अटॅक’ बीएचआरमधून ? : मोठ्या कारवाईची शक्यता

जळगाव प्रतिनिधी | एकनाथराव खडसे यांच्या कुटुंबियांवर झालेल्या ईडीच्या कारवाईनंतर याला प्रत्युत्तर म्हणून बीएचआर घोटाळ्यात एका लोकप्रतिनिधीवर कारवाई होण्याची शक्यता आहे. निवडणुकीशी संबंधीत असणार्‍या या प्रकरणाची आधीच चौकशी करण्यात आली असल्याने आता ईडीच्या कारवाईमुळे याबाबत थेट ऍक्शन होण्याची शक्यता आहे.

राज्य पातळीवर राजकीय सूडचक्र सुरू झाले असून याला आता जळगावातील राजकीय वैमनस्याची जोड मिळाली आहे. एकनाथराव खडसे यांनी भाजप सोडल्यानंतर त्यांना लागलीच ईडीची नोटीस मिळाली होती. या अनुषंगाने त्यांची जानेवारी महिन्यात ईडीने चौकशी देखील केली होती. यानंतर काही महिने हे प्रकरण थंड राहिल्यानंतर काल रात्री ईडीच्या पथकाने खडसेंचे जावई गिरीश चौधरी यांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांना अटक केली आहे. तर मंदाकिनी खडसे यांच्यावर देखील कारवाईची टांगती तलवार आहे.

दरम्यान, भाजपने एकनाथराव खडसे यांना जोरदार धक्का दिल्यानंतर याला राज्य सरकारतर्फे जोरदार प्रत्युत्तर दिले जाईल ही बाब जवळपास उघड आहे. यात जळगावातीलच बीएचआर प्रकरणात काही हाय-प्रोफाईल मंडळींना अटक होण्याची शक्यता आहे. यात एका लोकप्रतिनिधीचा समावेश असू शकतो. हा नेता मोठा व्यावसायिक असून त्याने आपल्या नावावर २०१४ च्या लोकसभा निवडणुकीतील पक्षाच्या उमेदवाराला मदत करण्यासाठी दोन कोटींचे कर्ज काढले. नंतर हे कर्ज पावत्या मॅच करून भरण्यात आले. याच रकमेवरून भाजपचे तत्कालीन खासदार ए.टी. नाना पाटील यांची राजकीय कारकिर्द संपविण्यात आली.

अलीकडच्या काळात ठेविदारांच्या पावत्या मॅच करून कर्जमुक्तीचे दाखले मिळवणार्‍यांना अटक करण्यात आली आहे. यामुळे संबंधीत लोकप्रतिनिधीवर देखील सहजपणे कारवाई करता येणार आहे. यामुळे ईडीच्या कारवाईवरील काऊंटर अटॅक म्हणून बीएचआर प्रकरणात नवीन धरपकड झाल्यास आश्‍चर्य वाटता कामा नये !

Exit mobile version