Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कॉंग्रेसच्या चौघा पदाधिकार्‍यांना कारणे दाखवा नोटीस

जळगाव प्रतिनिधी | जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पक्षाच्या आदेशाचे उल्लंघन करून पक्षाच्या विरोधात भूमिका घेतल्या प्रकरणी चौघा पदाधिकार्‍यांना प्रदेश कार्यालयाने कारणे दाखवा नोटीस बजावल्याचे वृत्त आहे.

या संदर्भात वृत्त असे की, जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक नुकतीच पार पडली. यात राष्ट्रवादी, शिवसेना आणि कॉंग्रेसच्या महाविकास आघाडीचे पॅनल मैदानात उतरले होते. याच पॅनलने दणदणीत विजय संपादन केला. मात्र यात उमेदवारी न मिळाल्याने तीन उमेदवारांनी अन्य पक्षीय उमेदवारांसोबत पॅनल करून याच पॅनलच्या विरूध्द निवडणूक लढविली होती. मतदारांनी मात्र महाविकास आघाडीच्या उमेदवारांना कौल दिला असून यात कॉंग्रेसचे दोन्ही उमेदवार निवडून आले. तर बंडखोरांना पराभव झाला होता.

या निवडणुकीत कॉंग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष राजीव रघुनाथ पाटील (रावेर), अरुणा दिलीपराव पाटील (धरणगाव), विकास वाघ (पाचोरा) यांनी कॉंग्रेस पक्षाने दिलेल्या उमेदवारांच्या विरोधात उमेदवारी केल्याने पक्षांतर्गत राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. तर या संदर्भात पक्षाचे प्रदेश सरचिटणीस डी. जी. पाटील यांनी पत्रकार परिषदांमधून स्थानिक नेत्यांविरूध्द तोफ डागली होती.

या प्रकरणाची प्रदेश कार्यालयाकडून गंभीर दखल घेण्यात आली. त्यात नोव्हेंबर महिन्यात चौघांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यानंतर खुलासा मागवला असता म्हणणे सादर न केल्याने पुन्हा गेल्या आठवड्यात नोटीस काढण्यात आली आहे. त्यात कॉंग्रेसच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात भाजपच्या उमेदवारासोबत पॅनल तयार करून भाजपच्या सहकार्याने निवडणूक लढवली. तसेच माध्यमातून पक्षास बदनाम करण्याचा प्रयत्न केल्याचा ठपका ठेवला आहे. या प्रकरणी प्रदेश सरचिटणीस प्रमोद मोरे यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशावरून नोटीस बजावली आहे. त्यात सात दिवसांत खुलासा मागवला आहे. अन्यथा शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

Exit mobile version