Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सुरेशदादांच्या प्रतिमेवरून शिवसेनेचे नगरसेवक आक्रमक; पुर्नस्थापना करण्याची मागणी

जळगाव प्रतिनिधी । माजी मंत्री सुरेशदादा जैन यांची प्र्रतिमा शिवसेनेच्या नगरसेवकांनी ताब्यात घेऊन याला पुन्हा पुर्नस्थापीत करण्याची मागणी केली आहे. यामुळे आता प्रतिमेवरून त्यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने हा मुद्दा तापणार असल्याचे दिसून आले आहे.

जळगावच्या राजकारणावर तब्बल साडे तीन दशकांपर्यंत वर्चस्व असणारे माजी मंत्री तथा माजी आमदार सुरेशदादा जैन यांच्या सभागृहातील तैलचित्रावरून आता वातावरण तापणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. नुकत्याच झालेल्या ऑनलाईन महासभेत याबाबत विरोधकांनी सत्ताधार्‍यांना धारेवर धरले होते. यानंतर गुरूवारी शिवसेनेच्या नगरसेवकांनी पालिका प्रशासनाकडील तैलचित्र आपल्या ताब्यात घेतले.

घरकुल घोटाळ्यात माजी मंत्री सुरेश जैन यांच्यासह ४८ नगरसेवकांना धुळे न्यायालयाने शिक्षा ठोठावली आहे. त्यातील आरोपी जामिनावर मुक्त असून काहींच्या शिक्षेला स्थगिती मिळाली आहे. दरम्यान शिक्षेचा निकाल प्राप्त होताच माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांच्या तक्रारीनंतर तत्कालिन पालिका आयुक्तांच्या आदेशाने सभागृहात लावण्यात आलेले सुरेश जैन यांचे तैलचित्र प्रशासनाने काढून टाकले होते. तथापि, यासाठी सभागृहाची मान्यता घेण्यात आली नसल्याचा मुद्दा उपस्थित करत शिवसेनेने महासभेत आक्रमक भूमिका घेतली.

दरम्यान, सुरेशदादा जैन यांचे हे तैलरंगातील छायाचित्र विरोधी पक्षनेत्यांच्या दालनात ठेवण्यात आले आहे. शिवसेनेचे विरोधी पक्षनेते सुनील महाजन, गटनेता अनंत जोशी, नितीन लढ्ढा, महानगरप्रमुख शरद तायडे, विष्णू भंगाळे, गणेश सोनवणे आदींनी आयुक्त सतीश कुलकर्णी यांची भेट घेतली. आ. गिरीश महाजनांसह महापौरांना पत्र देऊन ठरावाद्वारे तैलचित्र पुन्हा लावण्याची मागणी केली जाणार आहे.

Exit mobile version