Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

वाळू तस्कर एकमेकांना भिडले : पोलिसात मात्र तक्रार नाही

जळगाव प्रतिनिधी | अवैध वाळू वाहतूक राजरोसपणे सुरू असतांना आपलेच डंपर का पकडले ? या रागातून वाळू माफियांचा एक गट संतापला. यातून अजिंठा चौफुली परिसरात प्रचंड हाणामारी झाली असतांनाही पोलिसात तक्रार नोंदविण्यात आलेली नाही. मात्र या प्रकारामुळे वाळू तस्करांच्या मुजोरीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, माहिती अधिकार कार्यकर्ते दीपक कुमार गुप्ता यांच्या तक्रारीवरून जळगावच्या तहसीलदारांना एक डंपर जप्त केले. यामुळे संबंधीत डंपर चालकाने अजिंठा चौफुलीवरून जाणारे वाळूचे अन्य डंपर अडविले. यातून वाळू माफियांचे दोन तीन गट तेथे जमले. त्यांच्यात तुफान हाणामारी झाली.

दरम्यान, एका वाळू माफियाने भुसावळ येथून तरूणांची टोळी बोलावल्याने हा वाद चिघळला. यातून एका कारची तोडफोड देखील करण्यात आली. औद्योेगीक वसाहत पोलीस स्थानकाच्या कर्मचार्‍यांनी धाव घेतल्यानंतर सर्व जण पळून गेले. मात्र यात एकाला मारहाण करण्यात आली असून कारवर गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती देखील समोर आली आहे. हा सर्व प्रकार बुधवारी मध्यरात्री घडला असला तरी कुणीही तक्रार न दिल्याने पोलीसांनी याबाबत गुन्हा नोंदविलेला नाही.

Exit mobile version