अरे व्वा…नऊ कोटींच्या खर्चातून जळगावातील रस्ते होणार खड्डे मुक्त !

जळगाव प्रतिनिधी । रस्त्यांमधील खड्डयांनी त्रस्त झालेल्या जळगावकरांना महापालिकेने दिलासा देण्यासाठी नऊ कोटींची तरतूद केली आहे. या खर्चातून आता जळगावातील रस्ते खड्डेमुक्त होण्याची आस नागरिकांना लागली आहे.

जळगाव शहरातील रस्त्यांनी अक्षरश: चाळणी झाली आहे. शहरातील प्रमुख आणि अगदी कान्याकोपर्‍यातील रस्त्यांवर खड्डे पडल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. आता मात्र ही भयंकर स्थिती सुधारण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

महापालिका प्रशासनाने २३ सप्टेंबर रोजीच्या महासभेत ठराव केल्यानंतर पालिकेच्या निधीतून शहरातील प्रमुख रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामुळे शहरातील रस्ते खड्डेमुक्त होऊ शकतात.

जळगाव शहरातील १९ प्रभागातील १८ मीटर, १२ मीटर व ९ मीटरच्या रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी सुमारे ९ कोटींचा निधी खर्च केला जाणार आहे. यात प्रत्येक प्रभागात किमान ३५ लाख ते ४१ लाख रूपयांची कामे केली जाणार आहेत.यासाठी प्रसिध्द झालेल्या निवीदेतील विवरणानुसर डांबर मिश्रीत खडीने खड्डे बुजवण्यात येणार आहेत. ही कामे मनपा फंडातून केली जाणार आहेत. निविदा प्रक्रीया पंधरा दिवस राबवली जाईल. त्यामुळे रस्ते दुरूस्तीचे काम पुढील महिन्याच्या प्रारंभी होण्याची शक्यता आहे. अर्थात, हे काम चांगल्या दर्जाचे होते की नाही? यातही शंका आहेच !

Protected Content