Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगावातही ‘खून का बदला खून’चा प्रयत्न : पण घरात शिरून ‘गेम’ करण्याचा फसला प्लॅन

जळगाव जितेंद्र कोतवाल/संदीप होले | दोन दिवसांपूर्वी नशिराबाद येथे झालेल्या घटने प्रमाणेच जळगावातही ‘खून का बदला खून’ असा करण्याचा प्रयत्न झाला. यातून कांचन नगरात थेट घरात घुसून गोळीबार करण्यात आला. मात्र यात हल्लेखोरांना यश आले नाही. तर एक हल्लेखोर हा घटनास्थळीच जखमी होऊन बेशुध्द झाल्यामुळे त्याला ताब्यात घेण्यात आलेले आहे. अगदी सकाळीच घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवण्यास प्रारंभ केला आहे.

गत नोव्हेंबर महिन्याच्या प्रारंभी 4 नोव्हेंबर २०२० रोजी रात्री शिवाजीनगरातील स्मशानभूमिजवळ माजी महापौर अशोक सपकाळे यांचा मुलगा राकेश अशोक सपकाळे (वय २८) याचा एका टोळक्याने केलेल्या हल्ल्यात खून झाला होता. राकेश सपकाळे हा रात्री साडेअकराच्या सुमारास स्मशानभूमी परिसरातून येत असताना वाटेत दबा धरून बसलेल्या दोन अज्ञात तरुणांनी त्याला अडवले. या तरुणांनी सुरुवातीला त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर इतर मारेकर्‍यांनी चाकूने राकेशच्या गळ्यावर, मांडीवर सपासप वार केले. त्यामुळे राकेश रक्ताच्या थारोळ्यात जागीच कोसळला. त्यानंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला होता. यात त्याचा जागीच मृत्यू झाला होता. आधी झालेल्या भांडणातून काटा काढण्यासाठी राकेश सपकाळेचा खून करण्यात आल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले होते.

या खून प्रकरणी आकाश मुरलीधर सपकाळे (रा. कांचन नगर); गणेश दंगल सोनवणे (रा. वाल्मिक नगर), विशाल संजय सपकाळे (रा.राजाराम नगर), रुपेश संजय सपकाळे (रा.कांचन नगर) आणि महेश राजू निंबाळकर यांना अटक करण्यात आली होती. यातील संशयितांना नंतर जामीन मिळाला होता.www.livetrends.news यातीलच एक संशयित आकाश सपकाळे याच्यावर हल्लेखोरांनी आज सकाळी आठच्या सुमारास घरात शिरून हल्ला केला. प्राथमिक तपासात या खूनाचा आजच्या हल्ल्याशी संबंध असल्याचे निष्पन्न झाले आहे.

आकाश मुरलीधर सपकाळे यांच्या कुटुंबियांनी लाईव्ह ट्रेंडस न्यूजला दिलेल्या माहितीनुसार सकाळी आठच्या सुमारास आकाश आणि त्याचा भाऊ हे घरात झोपलेले होते. त्यांचा भाऊ हा जागी होता. अचानक तीन-चार तरूण घरात आले व त्यांनी गोळीबार सुरू केला. आकाशच्या भावाने तात्काळ यातील एका हल्लेखोराला पकडून धरले. यामुळे ते नंतर गोळीबार करू शकले नाही. मात्र आकाशच्या करंगळीला गोळी लागल्याने त्याला जखम झाली. लागलीच हल्लेखोर घरातून बाहेर पडून दुचाकींवरून पळून गेले. मात्र त्यातील एक जण हा घराबाहेर धावतांना पायर्‍यांवरून पाय घसरून पडला. यामुळे तो तिथेच बेशुध्द होऊन पडला. त्याच्या बाजूलाच पिस्तल, मोबाईल आणि काडतूस पडले. त्याला नंतर पोलिसांनी ताब्यात घेतले. या हल्ल्यात चार जणांनी सुमारे सहा फैरी झाडल्याची माहिती मिळाली आहे.

अवघ्या काही मिनिटांमध्ये हा थरार घडला. गोळीबाराचा आवाज ऐकून परिसरातील लोक धाव घेत नाही तोच हल्लेखोरांनी पलायन केले. www.livetrends.news तर पोलिसांनी बेशुध्द पडलेल्या आरोपीला ताब्यात घेतले असून शुध्दीवर आल्यावर त्यांची चौकशी सुरू केली आहे. शनिपेठचे निरिक्षक बळीराम हिरे आणि सहकार्‍यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी आणि सहायक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा यांनी सुध्दा घटनास्थळाची पाहणी करून तपासाला गती देण्याचे आदेश दिले आहेत.

Exit mobile version