Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

एम. जे. कॉलेजात ‘रात्रकालीन महाविद्यालय’ !

जळगाव प्रतिनिधी | काही कारणास्तव दिवसभरात शिक्षण घेऊ न शकणार्‍या विद्यार्थांसाठी केसीई सोसायटी संचलित मू. जे. महाविद्यालयात ‘रात्रकालीन महाविद्यालय’ सुरु करण्यात आले असून यात यंदापासून प्रवेश देण्यात येत आहे.

केसीई सोसायटी संचलीत मुळजी जेठा महाविद्यालयातील पत्रकार परिषदेत प्राचार्य डॉ. नंदकुमार भारंबे यांनी कमवा व शिका योजनेत कार्य करणार्‍या विद्यार्थांसह विविध कारणांमुळे दिवसभरात शिक्षण घेऊ न शकणार्‍या विद्यार्थांसाठी कान्ह कला वाणिज्य रात्रकालीन महाविद्यालय सुरु करण्यात आले असल्याची माहिती दिली.

याप्रसंगी डॉ. भारंबे म्हणाले की, पहिल्या टप्प्यात पदवी वर्गातील प्रथम, द्वितीय व तृतीय कला शाखेसह वाणिज्य शाखेचे वर्ग घेतले जाणार आहे. सायंकाळी ४ ते रात्री ८ या वेळेत हे वर्ग भरवले जाणार आहे. कला शाखेत संगीत, नाट्य, इंग्रजी, मराठी, राज्यशास्त्र, भूगोल, समाजशास्त्र हे विषय यासह वाणिज्य विषयाचे विषय घेवू शकणार आहेत. मू. जे. महाविद्यालयाच्या बँक ऑफ महाराष्ट्राजवळील इमारतीत हे वर्ग भरवले जाणार आहेत. जळगााव विद्यापीठाशी हे महाविद्यालय संलग्न असणार असून नियमित वर्गाप्रमाणेच अभ्यासक्रम व परीक्षा पदवी असणार आहे. यासह या विद्यार्थांना ग्रंथालय, क्रीडांगणासह स्पर्धात्मक परीक्षा क्षेत्राचाही लाभ घेता येणार आहे. याचा व्यवसायासह नोकरी करीत असताना शिक्षणाची आवड असणार्‍या विद्यार्थांसाठी लाभ होणार आहे.

या वर्गांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असून विद्यार्थांनी प्रवेश घ्यावेत असे असे आवाहन प्राचार्य डॉ. नंदकुमार भारंबे यांनी केले. याप्रसंगी प्रा. ए. आर. राणे, प्रा. संदीप केदार, सुभाष तळेले आदी उपस्थित होते.

Exit mobile version