Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अखेर…उघडले देवस्थानांचे द्वार !

जळगाव प्रतिनिधी । लॉकडाऊनमुळे जवळपास पावणे आठ महिन्यांपासून बंद असणार्‍या देवस्थानांचे द्वार आज सकाळपासून खुले करण्यात आले असून भाविकांसाठी शासनाने नियमांचे पालन करणे अनिवार्य केले आहे.

कोरोना व्हायरस या संसर्गजन्य आजाराचा प्रसार होऊ नये म्हणून महाराष्ट्र शासनाने विशेष आदेशपारित करीत देवस्थाने बंद ठेवले होते. यानुसार जिल्ह्यातील सर्व देवस्थाने बंद ठेवण्यात आले होते. दरम्यान मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पाडव्यापासून अर्थात आज दिनांक १६ नोव्हेंबर पासून मंदिरांसह सर्व धर्मियांची देवस्थाने खुली करण्यात येतील असे जाहीर केले होते. यानुसार आज सकाळपासून मंदिरे, मशिदी, चर्च, जैन मंदिरे, बौध्द विहार, गुरूद्वारा आदी देवस्थाने खुली करण्यात आली आहेत.

दरम्यान, देवस्थाने खुली करण्यात आली असली तरी यासाठी नियमांचे पालन करावे लागणार आहे. यात ६० वर्षापेक्षा जास्त वयस्कर असलेल्या भक्तांना व लहान मुलांना मंदिरात प्रवेश नाही दिली जाणार नाही. दर्शनासाठी आलेल्या भक्तांना मास्क अनिवार्य असुन सॅनिटाईज केल्यानंतरच मंदिरात प्रवेश मिळणार आहे. दर्शन रांगेत शासनाने ठरवुन दिलेल्या सामाजिक अंतराचे प्रत्येकाने पालन करणे अनिवार्य करण्यात आले आहे. या नियमांसह आज जळगाव जिल्ह्यातील सर्व देवस्थाने खुली करण्यात आली आहेत.

Exit mobile version