Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अब तक ४८ ! : शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी दिला बहुमताचा आकडा !

जळगाव प्रतिनिधी । शिवसेनेच्या महापौर व उपमहापौरपदाच्या उमेदवारांनी अर्ज दाखल करतांना पदाधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार आता त्यांच्याकडे ४८ नगरसेवकांचे पाठबळ असल्याचे संकेत मिळाले आहेत.

उद्या होणार्‍या महापौर व उपमहापौरपदाच्या निवडणुकीत आज शिवसेनेतर्फे अनुक्रमे जयश्री सुनील महाजन आणि कुलभूषण पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. याप्रसंगी सर्वांना उत्सुकता लागून असणारा विषय हा अर्थातच शिवसेनेकडे नेमके किती पाठबळ आहे याचाच होता.

या अनुषंगाने कुलभूषण पाटील यांनी आपल्यासोबत भाजपच्या एकूण ३० नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्याचे सांगितले. तर शिवसेनेकडे आधीच १५ सदस्य असून एमआयएमच्या तीन सदस्यांचा शिवसेनेला पाठींबा असल्याचे आज पुन्हा सांगण्यात आले. यामुळे शिवसेनेकडे तब्बल ४८ सदस्यांचे भक्कम बहुमत असल्याचा दावा आज शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी केला.

तर, माजी महापौर नितीन लढ्ढा यांनी कोणताही आकडा न सांगता उद्याचे बहुमत हे भाजपला न पेलणारा धक्का असेल असे सूतोवाच केल्यामुळे याबाबतची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. त्यांच्या बोलण्याचा रोख हा अजून पाठींबा वाढेल असा होता. मात्र याबाबत त्यांनी ठामपणे माहिती दिली नाही.

अर्थात, सध्या तरी शिवसेनेचे महापौर व उपमहापौरपदाचे उमेदवार अनुक्रमे सौ. जयश्री सुनील महाजन व कुलभूषण पाटील यांना ४८ मते मिळतील असा प्राथमिक अंदाज आहे. म्हणजेच शिवसेना व भाजपमधील सामना ४८ विरूध्द २७ असा असेल हे आज तरी दिसून येत आहे. यात अजून नंतरच्या काही नाट्यमय घडामोडी बदल घडवून आणू शकतात.

Exit mobile version