Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चोरट्यांचा धुमाकूळ; एका घरात दरोडा तर एका ठिकाणी चोरी !

जळगाव jalgaon प्रतिनिधी । शहरातील खेडी शिवारात असणार्‍या श्रीकृष्ण नगर, माऊली नगर व गुरूदेव नगरात रात्री चोरट्यांनी धुमाकूळ घालत एका ठिकाणी वृध्दाला मारहाण करत दरोडा टाकला. तर एका घरात चोरी केली असून दोन घरांमध्ये चोरीचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. यामुळे परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, खेडी ते दूरदर्शन टॉवरच्या दरम्यान असणार्‍या श्रीकृष्ण नगर आणि माऊली नगर या परिसरात काल रात्री चोरट्यांनी धुमाकूळ घातला. यात श्रीकृष्ण नगरात राहणार्‍या भोळे दाम्पत्याच्या घरात मारहाण करून दरोडा टाकला.

जगन्नाथ शंकर भोळे (वय६३) हे आपली पत्नी सौ. सुशीला तसेच मुलगा व सूनसह राहतात. ते आपल्या घरात झोपलेले असतांना पहाटे साडेतीन ते पावणेचार वाजेच्या सुमारास चोरट्यांनी मागच्या दरवाज्यातून आत प्रवेश मिळविला. त्यांनी जगन्नाथ भोळे यांच्या डोक्यावर बॅगने मारून त्यांना रक्तबंबाळ केले. तर त्यांच्या शेजारीच असणारा नातू चिंतामणी हा जागी झाल्याने त्याला देखील मारहाण करण्यात आली. यानंतर या सर्वांना धाक दाखवून त्यांच्या कपाटातील सुमारे ५० हजारांची रोकड लंपास केली. तर सौ. सुशील भोळे यांच्या गळ्यातील मंगळसूत्र देखील लांबविण्यात आले. तसेच घरातील दागीने देखील चोरण्यात आले. चोरट्यांनी घरातील सुमारे तीन तोळे सोन्याचे दागिने व ५० हजारांची रोकड लुटण्यात आल्याची माहिती भोळे दाम्पत्याने दिली.

दरम्यान, यासोबत चोरट्यांनी माऊलीनगरातील विजय सुकदेव चव्हाण यांच्या घरात देखील रात्री प्रवेश केला. घरात त्यांची पत्नी वैशाली ही तेरा वर्षाच्या मुलीसह झोपली होती. चोरट्यांनी त्यांच्या घरातून एक हजार रूपयांसह सात साड्या व बॅग चोरून नेली. ही बॅग थोड्या अंतरावर फेकून दिल्याचे सकाळी आढळून आले.

दरम्यान, रात्री अडीच वाजेच्या सुमारास याच भागातील गुरूदेव नगरातील रहिवासी असणार्‍या योगेश भानुदास पाटील यांच्या घरात चोरट्यांनी प्रवेश केला. मात्र त्यांना जाग आल्याने त्यांनी हटकल्यानंतर चोरट्यांनी पळ काढला. तर मागील बाजूस राहणार्‍या त्यांच्या भावाच्या घरालाही चोरट्यांनी बाहेरून कडी घातल्याचे दिसून आले.

या प्रकरणी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा पंचनामा करून गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू झाली होती.

Exit mobile version