Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

खान्देशात महा कृषी उर्जा अभियानास प्रतिसाद; ७७ कोटींचा भरणा !

जळगाव प्रतिनिधी । महा कृषी ऊर्जा अभियानास खान्देशात चांगला प्रतिसाद मिळाला असून कृषिपंपांच्या थकबाकीत तब्बल ६६ टक्के सवलत मिळवत खान्देशातील जवळपास ७० हजार शेतकर्‍यांनी ७७ कोटींचा भरणा केला आहे.

याबाबत वृत्त असे की, महा कृषी ऊर्जा अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे वीजबिलांतून थकबाकीमुक्त होण्यासाठी राज्यातील शेतकर्‍यांसह खान्देशातील शेतकर्‍यांनीही पुढाकार घेतला आहे. राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या पुढाकारातून वीजबिलांच्या वसुलीमधील तब्बल ६६ टक्के रकमेचा निधी हा संबंधित ग्रामपंचायत व जिल्ह्यातील कृषी वीजयंत्रणेच्या सक्षमीकरणासाठी वापरण्यात येणार आहे. या महत्त्वाच्या तरतुदीमुळे शेतकरी बिल भरण्यास प्रतिसाद देत आहेत.

याच्या अंतर्गत मागील वर्षी १ एप्रिल २०२० पासून जमा होणार्‍या वसुलीच्या रकमेची कृषी आकस्मिक निधी म्हणून स्वतंत्र नोंद ठेवली जात आहे. खान्देशाच्या कृषी आकस्मिक निधीमध्ये चालू व थकीत वीजबिलांच्या भरण्यातून आतापर्यंत एकूण ८० कोटी ५४ लाख रुपये जमा झाले आहेत. त्यापैकी ६६ टक्के रक्कम म्हणजे तब्बल ५३ कोटी १६ लाख रुपयांचा निधी संबंधित ग्रामपंचायत व जिल्ह्यातील कृषी वीजयंत्रणेच्या विविध कामांसाठी वापरण्यात येणार आहे. महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी सर्व शेतकर्‍यांचे अभिनंदन केले असून शेतकर्‍यांनी थकबाकीमुक्तीसह ग्रामपंचायत व जिल्ह्यातील वीजविषयक विकासासाठी गावकर्‍यांनी यापुढेही सकारात्मक भूमिका घेण्याचे आवाहन केले आहे.

या अभियानातील सहभागासोबतच आपल्या ग्रामपंचायत व जिल्हा क्षेत्रातील कृषी वीजयंत्रणेच्या विस्तारीकरण व सक्षमीकरणासाठी तब्बल ५३ कोटींचा हक्काचा ६६ टक्के निधीही या शेतकर्‍यांना मिळणार आहे. या अभियानात कृषिपंपांच्या वीजबिलापोटी जळगाव जिल्ह्यातील ३५ हजार ३८६ शेतकर्‍यांनी ४४ कोटी ३४ लाख, धुळे जिल्ह्यातील २० हजार १९० शेतकर्‍यांनी १३ कोटी १३ लाख तर नंदुरबार जिल्ह्यातील १४ हजार ११९ शेतकर्‍यांनी १९ कोटी ३१ लाख असे खान्देशात ६९ हजार ६९५ शेतकर्‍यांनी ७६ कोटी ७८ लाख रुपये भरले आहेत. कृषी आकस्मिक निधीमध्ये जळगाव जिल्ह्यास ३० कोटी ६४ लाख, धुळे जिल्ह्यास ९ कोटी तर नंदुरबार जिल्ह्यास १३ कोटी ५२ लाख रुपये उपलब्ध झाले आहेत. नवीन उपकेंद्र, वितरण रोहित्र, वीजजोडण्या, कृषी वाहिन्या आदींच्या कामांसाठी या निधीचा वापर होणार आहे. संबंंधित ग्रामपंचायत व जिल्ह्यातील वीजविषयक विविध कामांचे अंदाजपत्रक तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे तर अनेक ठिकाणी कामांना प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे.

महा कृषी उर्जा अभियान हे शेतकर्‍यांच्या हितासाठी असून याचा लाभ घेण्याचे आवाहन उर्जा खात्यातर्फे करण्यात आलेले आहे.

Exit mobile version