Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भादली रेल्वे गेट सुरू करा : खासदार उन्मेष पाटील

Jalgaon जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भादली येथील रेल्वे गेट बंद करण्यात आल्याने शेतकर्‍यांना फेरा पडत असून हे गेट सुरू करण्यात यावे अशी मागणी खासदार उन्मेष पाटील यांनी केली असून याबाबत त्यांनी रेल्वे अधिकार्‍यांसोबत भेट घेतली.

या संदर्भातील वृत्त असे की, नशिराबाद-कडगाव रस्त्यावरील रेल्वे गेट क्रमांक १५३ बंद करण्यात आले असून येथे अंडरपास बांधण्यात येण्याचे नियोजन करण्यात आले असले तरी याबाबत कोणत्याही प्रकारच्या हालचाली करण्यात आलेल्या नाहीत. नशिराबाद येथील बर्‍याच शेतकर्‍यांची शेती ही रेल्वेच्या पलीकडच्या भागात आहे. यामुळे दररोज शेतात जाण्यासाठी फेर्‍याने म्हणजे अवजड वाहनांसाठी तयार करण्यात आलेल्या पर्यायी मार्गाने जावे लागते. यासाठी आठ-नऊ किलोमीटरचा फेरा पडतो. यामुळे नशिराबदच्या शेतकर्‍यांची मोठ्या प्रमाणात कुचंबणा होत आहे. याबाबत अनेकदा निवेदने देऊन देखील काहीही उपाययोजन करण्यात आलेल्या नाहीत.

दरम्यान, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष लालचंद पाटील व त्यांच्या सहकार्‍यांनी याबाबत खासदार उन्मेषदादा पाटील यांच्याकडे तक्रार केली. यावरून त्यांनी रेल्वेच्या अधिकार्‍यांसोबत बैठक घेतली. याप्रसंगी रेल्वेचे बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता एस. के. झार यांच्याशी चर्चा करून रेल्वे विभागाला आरयूबी तयार होण्यासाठीच्या तांत्रिक अडचणी दूर होईपर्यंत रेल्वे प्रशासनाने रेल्वे गेट सुरू करण्याचे सूचना केल्या. त्यानुसार भुसावळ रेल्वे विभागात तात्काळ दोन दिवसात प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही रेल्वेचे वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिल्या.
यामुळे भादली येथील रेल्वेगेट सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या बैठकीला खासदार उन्मेषदादा पाटील यांच्यासह भारतीय जनता पक्ष्याचे महानगर अध्यक्ष दीपक सूर्यवंशी, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष लालचंद पाटील, भादलीचे सरपंच मिलिंद चौधरी, भाजपा तालुकाध्यक्ष गोपाळ भंगाळे, योगेश पाटील आदींची उपस्थिती होती.

Exit mobile version