Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बँकेतच महिलेवर अत्याचार; व्यवस्थापकावर गुन्हा दाखल

जळगाव प्रतिनिधी । कर्ज प्रकरणातून ओळख झालेल्या महिलेवर बँकेतच अत्याचार केल्या प्रकरणी बँक व्यवस्थापकाच्या विरूध्द गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे.

पीडित महिला सप्टेंबर २०१७मध्ये पंतप्रधान कर्ज योजनेची माहिती घेण्यासाठी मैत्रिणीसह शिव कॉलनीतील स्टेट बँकेच्या शाखेत गेल्या होत्या. या वेळी तेथे व्यवस्थापक अशोक सीताराम शर्मा याने त्यांचा मोबाइल क्रमांक घेतला. यानंतर १५ दिवसांनी महिलेस सुटीच्या दिवशी बँकेत बोलावले. बँकेत कोणीही नसल्याची संधी साधत शर्मा याने महिलेस शीतपेय पिण्यास दिले. पिल्यानंतर महिलेस गुंगी आली होती. यानंतर त्याने बँकेतच त्यांच्यावर अत्याचार केला. आक्षेपार्ह फोटो, व्हिडिओ तयार केले.

महिलेने पोलिस ठाण्यात तक्रार करण्याची धमकी देताच त्याने देखील फोटो, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. यानंतर संबंधित महिलेस वेळोवेळी फोन करून त्रास देणे सुरूच ठेवले. महिला नाशिक येथे गेलेली असताना फोटो, व्हिडिओ देण्याच्या बहाण्याने शर्मादेखील तेथे गेला. नाशिकमधील एका लॉजमध्येही आठ-नऊ वेळा अत्याचार केलेे. यानंतर शर्मा याने तिला लग्नाचे आमिष दिले. त्यासाठी महिलेस घटस्फोट घेण्यास भाग पाडले. शर्माच्या सांगण्यावरून महिलेने घटस्फोटही घेतला. पण शर्मा याने लग्न केले नाही. याउलट महिलेच्या पतीस पत्र पाठवून तिची बदनामी केली. महिलेस जीवे मारण्याची धमकी दिली. जातिवाचक शिवीगाळ करून तिला अपमानीत केले. अखेर या पीडित महिलेने जिल्हापेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version