ऑनलाइन पदवी प्रदान सोहळ्याची जय्यत तयारी

जळगाव प्रतिनिधी । कोरोनाच्या आपत्तीमुळे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा २९वा दीक्षान्त समारंभ ३ मे रोजी ऑनलाइन या प्रकारात होणार असून याची विद्यापिठातर्फे तयारी करण्यात आली आहे.

सविस्तर वृत्त खालील लिंकवर क्लिक करून वाचा

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा २९वा दीक्षान्त समारंभ सोमवार, दि.३ मे रोजी सकाळी १०.३० वाजता ऑनलाइन होणार आहे. कोरोना संसर्गजन्य स्थितीमुळे प्रतिबंधात्मक उपाययोजनांची नियमावली पाळून विद्यापीठात केवळ ९ ते १० अधिकार्‍यांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार आहे. एकही विद्यार्थी उपस्थित राहणार नाही. समारंभ कार्यक्रमाची लिंक संकेतस्थळावर प्रकाशित केली जाणार असून विद्यार्थ्यांनाही सहभागी होता येणार असल्याची माहिती विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरु प्रा. ई. वायुनंदन यांनी ऑनलाइन पत्रकार परिषदेत दिली.

दीक्षान्त समारंभाच्या अध्यक्षस्थानी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे तर प्रमुख पाहुणे म्हणून उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांची उपस्थिती राहणार आहे. या दीक्षान्त समारंभासाठी ४९ हजार ७५३ इतके स्नातक पदवी प्राप्त करण्यासाठी पात्र असून त्यापैकी नोंदणी केलेल्या २८ हजार ९८ स्नातकांना पोस्टाने पदवी प्रदान केली जाणार आहे. उर्वरित स्नातकांना त्यांच्या मागणीनुसार पदवी प्रमाणपत्र दिली जातील. या पदवी प्रमाणपत्रावर विद्याशाखेचे नाव प्रमाणपत्रावर क्यूआर कोड राहणार असून या कोडच्या सहाय्याने मोबाइल अ‍ॅप्लिकेशनद्वारे पदवी पडताळणी करता येईल. प्रमाणपत्रावरील विद्यापीठाच्या होलोग्राममुळे प्रमाणपत्राची सुरक्षितता अधिक वाढली आहे. स्नातकांसाठी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर सोमवारी सकाळी ९.३० वाजता लिंक उपलब्ध होईल. यासह संस्थाचालक, प्राचार्य, प्रशाळा संचालक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी समारंभामध्ये याच लिंकद्वारे ऑनलाइन सहभागी होऊ शकतील. या कार्यक्रमाचे लाइव्ह प्रक्षेपण देखील करण्यात येणार आहे.

दरम्यान, यंदा ९९ विद्यार्थी सुवर्णपदकाचे मानकरी ठरले. त्यात ६६ विद्यार्थिनी आणि ३३ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. सुवर्णपदक प्राप्त होणार्‍या विद्यार्थ्यांची यादी विद्यापीठ संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. सध्याची कोविड प्रादुर्भावाची परिस्थिती लक्षात घेऊन या दीक्षान्त समारंभानंतर सर्व विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र पोस्टाद्वारे पाठवले जाणार आहे. पुढील १५ दिवसांत ते घरपोच मिळतील. तसेच सुवर्णपदक प्राप्त विद्यार्थ्यांनाही या समारंभात सुवर्णपदक दिले जाणार नाही. त्याबाबतची माहिती या विद्यार्थ्यांना वैयक्तिकरीत्या कळवली जाईल. अधिकची माहिती विद्यापीठ संकेतस्थळावर उपलब्ध होईल. त्याकरिता विद्यार्थ्यांनी विद्यापीठ संकेतस्थळावर वेळोवेळी भेट द्यावी, असेही यावेळी सांगण्यात आले. या ऑनलाईन पत्रकार परिषदेस प्रभारी प्र-कुलगुरु प्रा. बी.व्ही. पवार, प्रभारी कुलसचिव डॉ. शामकांत भादलीकर, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक बी.पी. पाटील उपस्थित होते.

Protected Content