Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पोलीसदादाने उगारली लाठी…नंतर मागितली माफी !

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा प्रशासनाच्या तीन दिवसांच्या कडक निर्बंधांमध्ये बाहेर पडणार्‍यांवर कारवाई करण्यात येत आहे. मात्र ज्यांना खरोखर गरज आहे अशांना मात्र यातून वगळण्यात आले आहे. या अनुषंगाने आपल्या मुलीच्या औषधीसाठी बाहेर पडलेल्या एका तरूणाला पोलिसांनी लाठीचा मार दिल्यावर त्याने थेट वरिष्ठांकडे तक्रार केल्यानंतर संबंधीतांनी दिलगिरी व्यक्त करण्याचा प्रकार घडला.

लाईव्ह ट्रेंडस न्यूजला अनेक वाचक कॉल करून माहिती देत असतात. अशाच एका वाचकाने दिलेल्या माहितीवरून एक भन्नाट स्टोरी समोर आली आहे. ती अशी की, सौरभ मोरे हे आपल्या मुलीची औषधी घेण्यासाठी आज दुपारी बाहेर पडले होते. सिंधी कॉलनी परिसरात एमआयडीसी पोलिसांनी त्यांना अडविले. यावेळी मोरे यांनी आपण मुलीच्या औषधीसाठी बाहेर पडल्याचे सांगीतले असतांनाही त्यांना पोलिसांनी दंड्याने मारहाण केले. यामुळे सौरभ मोरे यांनी थेट जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या कार्यालयात भेट दिली. जिल्हाधिकारी बैठकीत व्यस्त असतांनाही त्यांनी मोरे यांनी अप्पर पोलीस अधिक्षक कुमार चिंथा यांना भेटण्याची सूचित केले. यानुसार ते कुमार चिंथा यांना भेटले असता त्यांनी आपण संबंधीत पोलिसांवर कारवाई करणार असल्याचे सांगत त्यांना एमआयडीसी पोलीस स्थानकात तक्रार देण्याचे सांगितले.

या निर्देशानुसार, सौरभ मोरे हे औद्योगिक वसाहत पोलीस स्थानकात गेल्यानंतर संबंधीत पोलीस कर्मचार्‍याने त्यांची माफी मागितली. यामुळे त्यांनी पुढे तक्रार केली नाही. यानंतर मोरे यांनी लाईव्ह ट्रेंडस न्यूजला कॉल करून याबाबतची माहिती दिली. ते म्हणाले की, पोलीस प्रशासनावर खूप तणाव असल्याची बाब कुणीही अमान्य करणार नाही. मात्र खातरजमा न करता मारहाणीचे समर्थन कुणीही करणार नाही. तथापि, एक सुजाण नागरिक म्हणून आपण संबंधीत पोलिसाची तक्रार केली नाही.

दरम्यान, या सर्व प्रकरणात जिल्हाधिकारी अभिजीत राऊत आणि अप्पर पोलीस अधिक्षक कुमार चिंथा यांनी तातडीने माझ्यासारख्या सर्वसामान्य नागरिकाची दखल घेऊन तातडीने कार्यवाही केली ही समाधानकारक बाब असल्याचे सौरभ मोरे यांनी आवर्जून नमूद केले.

Exit mobile version