Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पालखीच्या अभिवाचनाने रसिक मंत्रमुग्ध

जळगाव प्रतिनिधी । परिवर्तन संस्था आयोजित भाऊंना भावांजली कला महोत्सवात भाऊंच्या अँफी थिएटरमध्ये दि. बा. मोकाशी लिखित पालखी या कादंबरीचे अभिवाचन केले. यातून परिवर्तनच्या कलाकारांनी पंढरपूरची वारी आणि वारकरी संप्रदायाविषयी मराठी माणसांच्या मनात असलेल्या अध्यात्मिक भावनिक नात्याचा उलगडा करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

महोत्सवाच्या दुसर्‍या दिवशी पालखीच्या अभिवाचनातून अभंग, वारीतील गमती-जमती, हौसे-नवसे-गवसेची त्रयी प्रेक्षकांना अनुभवता आली. अभिवाचनात नितीन पाटील यांनी काढलेले विठ्ठलाच्या रेखाचित्राने वारीची अनुभूती दिली. अनिल कांकरिया यांनी प्रास्ताविक केले. मध्य प्रदेश साहित्य अकादमीच्या अध्यक्षा पौर्णिमा हुंडीवाले, पल्लवी मयूर, मधुकर पाटील, शरद पांडे, ज्ञानेश्‍वर बढे, अनिल कांकरीया, अमर कुकरेजा, आनंद मलारा, किरण बच्छाव, नारायण बाविस्कर, शरद पांडे उपस्थित होते. प्रतीक्षा कल्पराज यांनी सूत्रसंचालन केले.

अभिवाचनात होरिलसिंग राजपूत यांनी अनेक भूमिका साकारल्या. तर मंगेश कुलकर्णी यांनी वारीतील अनेक प्रसंग उत्कटपणे रसिकांसमोर साकारले. विक्रम पट्टी यांच्या सहज अभिवाचनातून वारीतल्या महिलांचे तसेच जगण्यातले अनुभव मांडले. ईशा वडोदकर यांनी पालखीतील निवेदन व वेगवेगळे प्रसंग व त्यातील भूमिका साकारत उत्तम पद्धतीने वारीतील अनुभव दर्शन करून दिले. हर्षल पाटील यांनी कांदबरीतील निवेदकाची भूमिका मांडत वारीचा शोध घेणार्‍या लेखकाचा विचार रसिकांना जिवंत अभिनयाने करून दिला. सुयोग गुरव यांनी सुमधुर आवाजात गायलेल्या अभंगांनी व मनीष गुरव यांच्या तबला वादनाने अभिवाचनात भक्तीचा रंग भरला. सुनीला भोलाने यांनी लेखकाची भूमिका मांडली. कादंबरी नाट्यरूपांतर शंभू पाटील यांनी केले. दिग्दर्शन मंजूषा भिडे यांचे, तर संकल्पना हर्षल पाटील यांची होती.

Exit mobile version