ना. गुलाबराव पाटील यांचे मंत्रीपदाचे एक वर्ष : आपत्तीतली आश्‍वासक वाटचाल !

राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या या पंचवार्षीकमधील मंत्रीपदाला १ जानेवारी २०२१ रोजी एक वर्ष पूर्ण झाले आहे. यानिमित्त त्यांच्या मंत्रीपदाच्या कार्यकाळाचा घेतलेला हा आढावा.

गत विधानसभा निवडणुकीनंतर अनेक नाट्यमय घडामोडी झाल्या. यातून महाविकास आघाडी सरकार सत्तारूढ झाले. यात गेल्या पंचवार्षिकमध्ये राज्यमंत्री असणारे गुलाबराव पाटील यांना बढती मिळून त्यांना पाणी पुरवठा व स्वच्छता या महत्वाच्या खात्याच्या कॅबिनेट मंत्रीपदाची जबाबदारी मिळाली. यात जवळपास पावणे तीन महिन्यांचा कालावधी वगळता आजवर कोरोनाच्या आपत्तीने ग्रासले आहे. यामुळे साहजीकच कोरोनाच्या आपत्तीचा सामना आणि विकासकामे या दोन्ही पातळ्यांवर ना. गुलाबराव पाटील यांना लढा द्यावा लागला. यात ते बर्‍यापैकी यशस्वी झाल्याचे आपल्याला दिसून येत आहे.

जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रूग्ण आढळल्यानंतर तातडीने प्रशासकीय योजना करण्यात आल्या. तथापि, पहिल्या टप्प्यात वाढलेल्या मृत्यूदरामुळे जळगावचे नाव बदनाम झाले. मात्र यानंतर प्रयत्नपूर्वक कोरोनाचा यशस्वी प्रतिकार करण्यात प्रशासनाला यश आले असून यात पालकमंत्री म्हणून ना. गुलाबराव पाटील यांची भूमिका सर्वात महत्वाची व निर्णायक राहिलेली आहे. यात सर्वात लक्षणीय बाब म्हणजे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अद्यायावत सुविधा उभारण्यात आल्या. कोविड व नॉन-कोविड रूग्णांना स्वतंत्रपणे वैद्यकीय सुविधा उपलब्ध करण्यात आल्या. सिव्हीलमध्ये विक्रमी वेळात कोविड तपासणी प्रयोगशाळा उभारण्यात आली. येथेच अतिशय सुसज्ज कोविड कक्ष उभारण्यात आला. येथे पाईपलाईनच्या मदतीने ऑक्सीजन पुरवठ्याची प्रणाली कार्यान्वित करण्यात आली. तर प्रत्येक तालुक्यात कोविड केअर सेंटर्स उभारण्यात आले. मध्यंतरी कोरोनाचा प्रकोप मोठ्या प्रमाणात असतांना तालुका पातळीवर लोकसहभागातून ऑक्सीजन बेडची निर्मिती करण्यात आली. याची सर्वत्र वाखाणणी करण्यात आली. यासोबत प्रत्येक कोरोना रूग्णाची सुश्रुषा करण्यासाठी बेडसाईड असिस्टंटचा जळगाव पॅटर्न देखील कौतुकास पात्र ठरला असून याचे श्रेय हे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनाच जाते. यामुळे जिल्ह्यातील कोरोनामुक्तीचा दर वाढतांना मृत्यू दरात लक्षणीय घट झाल्याचे दिसून येते. आरोग्य यंत्रणांच्या बळकटीकरणासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून आतापर्यंत ४५ कोटी ५९ लाख ३४ हजार रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून २२ कोटी ७१ लाख ७२ हजार रुपयांचा निधी संबंधित यंत्रणांना वितरीतही करण्यात आला आहे.

कोरोनाच्या आपत्तीमुळे यंदा अन्य कामांना मिळणार्‍या निधीला कात्री लागल्याने खूप अडचणी निर्माण झाल्या. मात्र असे असतांनाही जिल्ह्यातील अनेक कामे मार्गी लावण्यात आली. राज्यात प्रथमच सर्व जिल्हा परिषद शाळांना सुरक्षा भिंती बांधण्यास मान्यता देण्यात आली आहे. जिल्ह्यातील प्रत्येक शाळेला संरक्षण भिंत बांधण्यासाठी पालकमंत्री संरक्षण भिंत योजनेच्या अंतर्गत ३ टप्प्यात ९२५ शाळांना याचा लाभ होणार आहे. पहिल्या टप्प्यात १३.४२ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला असून पुढील टप्प्यात ५० कोटी निधी खर्चून ३०० शाळांना संरक्षण भिंत देऊन सुरक्षित केले जाणार आहे. या माध्यमातून ९ लाख मनुष्य दिवस रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट देखील ठेवण्यात आले आहे. तर, शेतकर्‍यांना दळणवळणासाठी शेत व पाणंद रस्ते सुस्थितीत राहावेत, याकरिता जिल्ह्यातील ५०० रस्त्यांच्या कामांना मान्यता देऊन जिल्हा नियोजन व विकास समितीमधून ५ कोटी रुपये निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. तर, आता हळूहळू निधीचा मार्ग मोकळा होत असल्याने २०२१ मध्ये विविध कामांना गती मिळेल अशी अपेक्षा आहे.

जळगाव जिल्ह्याच्या अर्थकारणाचा केंद्रबिंदू असणार्‍या केळीचे उत्पादन घेणार्‍या शेतकर्‍यांसाठी जिल्ह्यात केळी महामंडळ उभारण्याच्या महत्वाच्या कामाला ना. गुलाबराव पाटील यांनी चालना दिली आहे. याच्या जोडीला कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात संत साहित्य अध्यासन केंद्र उभारण्याच्या महत्वाच्या प्रस्तावचा मार्ग देखील मोकळा झाला आहे. याच्या जोडीला अमळनेरात लोककला भवन तर जळगावात वारकरी भवन उभारण्याच्या महत्वाच्या घोषणा देखील त्यांनी केल्या आहेत. तर हतनूर (ता. भुसावळ) येथे राज्य राखीव दलाचे बाहेर जिल्ह्यात जाणारे प्रशिक्षण केंद्र त्यांनी तेथेच सुरू करण्यात महत्वाची भूमिका पार पाडली आहे.

ना. गुलाबराव पाटील यांचे खाते असणार्‍या पाणी पुरवठा व स्वच्छता या दोन्ही मंत्रालयातील त्यांचे काम देखील लक्षणीय राहिले आहे. यात प्रामुख्याने यंदा केंद्र सरकार पुरस्कृत जल जीवन मिशन राबवण्यास मान्यता दिली, ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला वैयक्तिक नळ जोडणीद्वारे दरडोई ५५ लिटर प्रतिदिन गुणवत्तापूर्ण पाण्याचा पुरवठा करण्याचे उद्दिष्ट असून यासाठी अंदाजे १३ हजार ६६८ कोटी ५० लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यासोबत
सामुदायिक शौचालय अभियानांतर्गत राज्याचा देशात दुसरा क्रमांक आला. गंदगी मुक्त अभियानात श्रमदान प्रकारात राज्याला तिसर्‍या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. सामुदायिक शौचालय अभियानांतर्गत जळगाव जिल्ह्याला देशातील तिसर्‍या क्रमांकाचा, तर भंडारा जिल्ह्यातील २ ग्रामपंचायतींना द्वितीय व तृतीय क्रमांक मिळाला आहे. जागतिक शौचालय दिनानिमित्त झालेल्या केंद्रस्तरीय कार्यक्रमांमध्ये महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि नाशिक जिल्ह्याला राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार मिळाले. या माध्यमातून पाणी पुरवठा व स्वच्छता खात्याची कामगिरी चमकदार राहिली आहे.

२०२१ या वर्षात कोरोनाच्या लसीकरणासह जिल्ह्यातील विकासकामांना गती देण्याचे आव्हान पालकमंत्री या नात्याने ना. गुलाबराव पाटील यांच्या समोर राहणार आहे.

Protected Content