Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

वाळू तस्करांवर होणार स्थानबध्दतेची कारवाई !

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यातील अवैध वाळू वाहतुकीविरुद्ध महसूल, पोलिस आणि उपप्रादेशिक परिवहन विभागातर्फे संयुक्त कारवाई करण्यासह उपद्रवी वाळू तस्करावर स्थानबध्दतेच्या कारवाईसाठी त्वरित प्रस्ताव पाठवण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी दिले आहेत.

जिल्हाधिकारी राऊत यांनी बुधवारी महसूल, पोलिस व उपप्रादेशिक परिवहन विभागाची संयुक्त बैठक घेतली. बैठकीला पोलिस अधीक्षक प्रवीण मुंडे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही, अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन व इतर अधिकारी उपस्थित होते. यात वाळू तस्करांवर जिल्ह्यात कारवाईची संख्या कमी असून ती वाढवण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी दिले आहेत. वाळू तस्करावर दंडात्मक कारवाईबरोबर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची कारवाईही करण्यात यावी. उपद्रवी वाळू तस्करांचे स्थानबध्दतेच्या कारवाईसाठी प्रस्ताव पाठवण्याचेही आदेश जिल्हाधिकार्‍यांनी दिले आहे. महसूल, पोलिस व आरटीओ विभागाने वाळू तस्करीवर संयुक्त कारवाई करावी. त्यासाठी आपसात समन्वय ठेवण्याच्या सूचना दिल्या.

दरम्यान, वाळू तस्करांवर स्थानबध्दतेच्या कारवाईचे अधिकार असतांना सुध्दा जिल्ह्यात आजवर याबाबतच्या मोजक्या कारवाया करण्यात आल्या आहेत. या पार्श्‍वभूमिवर जिल्हाधिकार्‍यांचे हे निर्देश महत्वाचे मानले जात आहेत.

Exit mobile version