Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कांताई बंधार्‍यात मुलगा गेला वाहून : तिघे बचावले

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथून जवळच असलेल्या कांताई बंधार्‍यात चार जण वाहून गेले असून तिघांना वाचविण्यात आले असून एक जण मात्र बेपत्ता झाला आहे.

शहरापासून जवळच मोहाडी गावाच्या पुढे गिरणा नदीवर कांताई बंधारा बांधलेला आहे. पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू म्हणून या बंधार्‍याची ओळख निर्माण झाली आहे. यामुळे येथे नेहमी जळगावसह परिसरातील नागरिकांची वर्दळ असते. अनेक जण येथे सहलीसाठी जात असतात. याच प्रकारे आज रविवारच्या सुटीनिमित्त शहरातील दूध फेडरेशन जवळच्या मिथीला अपार्टमेंटमधील तरूण-तरूणी येथे आज सहलीसाठी गेले होते.

याप्रसंगी कांताई बंधार्‍याजवळच्या नागाई-जोगाई मंदिराजवळ एक तरूणी पाण्यात पडली. तिला वाचविण्यासाठी इतरांनी प्रयत्न केले. यात चौघे जण बुडण्याची स्थिती निर्माण झाली. परिसरातील नागरिकांनी यातील समिक्षा योगिता दामू पाटील (वय २०) ;विपीन शिरडुकर (वय १७) आणि सागर दामू पाटील (वय २४) या तिघांना वाचविण्यात आले. दरम्यान, नयन योगेश निंबाळकर (वय १४) हा मुलगा पाण्याच्या प्रवाहात बेपत्ता झाला असून त्याचा शोध सुरू करण्यात आला आहे.

अचानक घडलेल्या या दुर्घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. शेवटचे वृत्त हाती आले तोवर बेपत्ता मुलाचा शोध लागला नव्हता.

Exit mobile version