Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

विद्यापीठातील लाकडांचा साठा महापालिका प्रशासनाला मिळणार

kulbhushan patil

जळगाव प्रतिनिधी । कोविडच्या आपत्तीमुळे शहरातील नेरी नाका स्मशानभूमित लाकडांची मोठ्या प्रमाणात आवश्यकता भासत असतांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापिठातून आता महापालिका प्रशासनाला सुमारे १०० टन पेक्षा जास्त लाकडे मिळणार असून या संदर्भात उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी आज आयुक्तांसह विद्यापीठ प्रशासनाशी चर्चा केली आहे.

याबाबत वृत्त असे की, सध्या नेरी नाका स्मशानभूमि ही कोरोना रूग्णांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी राखीव करण्यात आलेली आहे. यातच आता मृत्यूचे प्रमाण वाढलेले असल्यामुळे लाकडेही मोठ्या प्रमाणात लागत आहेत. या पार्श्‍वभूमिवर, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापिठाकडे असणारा लाकडांचा साठा महापालिका प्रशासनाला मिळावा यासाठी उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी प्रयत्न सुरू केले आहेत.

विद्यापीठात खूप मोठ्या प्रमाणात वृक्षराजी असून यातील कोरडे झालेली लाकडे जमा करण्यात येतात. आजवर विद्यापीठाकडे १०० टनांपेक्षा जास्त सुकलेली लाकडे जमा झालेली आहेत. खरं तर, विद्यापीठाने आधीच महापालिकेला स्मशानभूमिसाठी हा लाकडांचा साठा मोफत देण्यासाठी पत्रव्यवहार दिला होता. मात्र प्रशासनाने याकडे लक्ष दिले नाही. यामुळे विद्यापीठ प्रशासनाने ही लाकडे लिलावाच्या माध्यमातून विकण्याच्या हालचाली सुरू केल्यानंतर महापालिकेने त्यांची विनंती करून हा लिलाव स्थागित केला होता. मात्र या नंतरही हा साठा महापालिकेला मिळावा यासाठी कोणतेही प्रयत्न करण्यात आले नव्हते.

ही बाब लक्षात घेऊन आज उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी महापालिका प्रशासनाने कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापिठाशी केलेल्या पत्रव्यवहाराची माहिती घेऊन आयुक्त सतीश कुलकर्णी यांच्याशी चर्चा केली. यानंतर त्यांनी विद्यापीठ प्रशासनाशी प्राथमिक चर्चा करून याबाबत उद्या बैठक घेण्याची तयारी केली आहे. या बैठकीतून सकारात्मक तोडगा निघून लाकडांचा मोठा साठा महापालिका प्रशासनाला मिळेल अशी माहिती उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी दिली आहे.

Exit mobile version