Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चार विद्यापीठांच्या पत्रकारिता विभागांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकारदिनी कार्यशाळा

जळगाव प्रतिनिधी-कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या जनसंवाद आणि पत्रकारिता विभागासह महाराष्ट्रातील चार विद्यापीठाच्या पत्रकारिता आणि जनसंज्ञापन विभागांनी एकत्रित येऊन दिनांक 6 जानेवारी रोजी पत्रकार दिनाच्या निमित्ताने राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन केले आहे

या कार्यशाळेमध्ये महाराष्ट्राच्या माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक अजय अंबेकर ‘माध्यम प्रसिद्धी बदलती तंत्रे’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत .तर दैनिक सकाळ (पुणे )चे संपादक सम्राट फडणीस हे ‘पत्रकारितेचे समोरील आजची आव्हाने’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ .मृणालिनी फडणवीस राहणार आहेत.

याप्रसंगी सोलापूर विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा देवेंद्रनाथ मिश्रा तसेच सामाजिकशास्त्र संकुलाचे संचालक प्रा जी एस कांबळे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे .
महाराष्ट्रातील चार विद्यापीठांच्या जनसंवाद आणि पत्रकारिता विभागांनी एकत्रित येऊन हा उपक्रम आयोजित केलाआहे. यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या मास कम्युनिकेशन विभागाचे प्रमुख डॉ. रवींद्र चिंचोलकर, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथील पत्रकारिता व जनसंज्ञापन विभागाच्या प्रमुख डॉ. निशा पवार, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथील जनसंवाद आणि पत्रकारिता विभागाचे प्रमुख डॉ. सुधीर भटकर तसेच नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील स्कूल ऑफ मिडिया स्टडीजचे संचालक प्रा. दीपक शिंदे यांच्यासह या चारही विद्यापीठांमधील पत्रकारितेची शिक्षक व विद्यार्थी सहभागी होणार आहेत.

झूम या ऑनलाईन प्लॅटफॉर्मद्वारे सकाळी अकरा ते दुपारी एक दरम्यान या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती सामाजिक शास्त्र संकुलाचे संचालक प्रा .जी . एस . कांबळे यांनी दिली . अधिक माहितीसाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या जनसंवाद आणि पत्रकारिता विभागाचे प्रमुख डॉ.सुधीर भटकर व डॉ.विनोद निताळे यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे .

Exit mobile version