आसोद्याच्या सुपुत्राने सांभाळली सैन्यदलातील दुसर्‍या क्रमांकाच्या पदाची धुरा !

Jalgaon News जळगाव प्रतिनिधी । बहिणाबाई चौधरी यांच्या नावाने ओळखल्या जाणार्‍या आसोद्यातील जगदीश बळीराम चौधरी यांनी लेप्टनंट जनरल या सैन्यदलातील दुसर्‍या क्रमांकाच्या पदाची सूत्रे हाती घेतली आहेत. याबाबत आधीच घोषणा झाली असली तरी त्यांनी आता प्रत्यक्षात पदभार स्वीकारला असून जिल्ह्यासाठी ही अतिशय अभिमानाची बाब मानली जात आहे.

सध्या मेजर जनरल या पदावर असणार्‍या जगदीश बळीराम चौधरी यांना सैन्यदलातील दुसर्‍या क्रमांकाचे सर्वोच्च पद असलेल्या लेप्टनंट जनरल या पदावर ऑक्टोबर २०२० मध्ये पदोन्नती मिळाली होती. त्यांनी शुक्रवारी आपल्या पदाचा कार्यभार सांभाळला आहे. या अतिशय मानाच्या व जबाबदारीच्या पदाची सूत्रे त्यांनी आता सांभाळली आहेत.

जगदीश चौधरी Lieutenant General Jagdish Chaudhari यांचे प्राथमिक शिक्षण आसोद्यात झाले असून त्यांनी पुढील शिक्षण सातारा सैन्य स्कूल व एनडीएमध्ये त्यांनी पुढील शिक्षण घेतले आहे. सन १९८७पासून ते सैन्यदलात कार्यरत आहेत. यात त्यांनी कॅप्टन, लेफ्टनंट कर्नल, कर्नल, ब्रिगेडीयर या महत्त्वाच्या पदांवर यशस्वीरित्या कार्य केले आहे. उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधीश विश्‍वास चौधरी यांचे ते लहान बंधू आहेत.

जगदीश चौधरी यांनी भारतीय सैन्यदलात विविध पदांवर काम करतांना देश-विदेशात आपल्या कामाची अमिट मोहर उमटवली आहे. सन १९८९मध्ये त्यांनी केलेल्या युद्ध क्षेत्रातील लक्षणीय कामगिरीकरिता सेना मेडल देवून सन्मानित करण्यात आले होते. तर यंदा फेब्रुवारीच्या अखेरीस त्यांना विशिष्ट सेवा मेडलने देखील सन्मानित करण्यात आलेले आहे. आता ते सैन्यातील दुसर्‍या क्रमांकाच्या पदावर विराजमान झाले आहेत.

बहिणाबाई चौधरी Bahinabai Chaudhari यांच्या नावाने ओळखल्या जाणार्‍या आसोद्यातील जगदीश चौधरी यांची कर्तबगारी ही समस्त जिल्हावासियांसाठी अभिमानाची बाब होय.

Protected Content